Sara Kahi Tichyasathi : वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका (Serial) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सिनेमे आणि ओटीटी प्लॅटफॉर्म असले तरी मालिका पाहणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. प्रेक्षकांना मालिकेत गुंतवून ठेवण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शकही वेगवेगळे प्रयोग करत आहेत. आता 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेची गोष्ट आहे दोन सख्ख्या बहिणींची. ज्या गेले 20 वर्ष एकमेकींना भेटल्या नाहीत. मोठी बहीण उमा तळकोकणात आपल्या सासरी सुखाने नांदतेय आणि लहान बहीण संध्या तिच्या मुली सोबत गेले २० वर्ष लंडनमध्ये स्थायिक आहे.
दोघींच्या आयुष्यात 20 वर्षांपूर्वी एक अशी घटना घडली ज्यामुळे त्या एकमेकींना कायमच्या दुरावल्या. पण म्हणतात ना रक्ताची नाती कितीही लांब गेली तरी मनातला जिव्हाळा कमी होत नाही. आजही असा एक दिवस जात नाही जेव्हा उमा आणि संध्याला एकमेकींची आठवण येत नसेल. उमाचा नवरा रघुनाथ खोत हे गावातील मोठे प्रस्थ आहे. ते स्वदेशीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. 20 वर्षांपूर्वी रघुनाथरावांना दिलेल्या वचनाखातर उमाने आपल्या लहान बहिणीशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले. पण समजा २० वर्ष पाळलेले वचन काही कारणामुळे उमाला मोडावे लागले तर?
स्वदेशीचा पुरस्कार आणि परदेशी गोष्टींचा विरोध करणारे रघुनाथ, लंडनमध्ये वाढलेल्या संध्याच्या मुलीला स्वीकरतील का? दोन बहिणींमध्ये असे काय घडलेले ज्यामुळे दोघी एकमेकींना कायमच्या दुरावल्या? अशाच दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी उमाने उचललेले पाऊल म्हणजे "सारं काही तिच्यासाठी " रघुनाथ रावांच्या भूमिकेत जेष्ठ अभिनेते 'अशोक शिंदे' दिसणार आहेत, उमाची भूमिका साकारणार आहे 'खुशबू तावडे' आणि संध्याच्या भूमिकेतून 'शर्मिष्ठा राऊत' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेचा प्रोमो आऊट झाल्यापासून प्रेक्षक मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका येत्या 21 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 21 ऑगस्टपासून संध्याकाळी सात वाजता प्रेक्षक झी मराठीवर ही मालिका पाहू शकतात.
संबंधित बातम्या