मुंबई : 'झी मराठी' वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या'ने महाराष्ट्राला वेड लावलं आहे. बॉलिवूडमधील ताऱ्यांनाही या शोने भुरळ घातली असून आता 'सुलतान' चित्रपटाच्या निमित्ताने चक्क सुपरस्टार सलमान खान उपस्थिती लावणार आहे.
'चला हवा येऊ द्या'मध्ये आतापर्यंत शाहरुख खान, सोनम कपूर, जॉन अब्राहम, विद्या बालन यासारख्या बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली आहे. त्यानंतर सलमान खान आणि अनुष्का शर्माही सुलतान चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार असल्याची माहिती आहे.
येत्या बुधवारी गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये कार्यक्रमाचं शूटिंग होणार असून दोघांवर दोन एपिसोड शूट होणार आहेत. काहीच दिवसांपूर्वी कपिल शर्माच्या शोमध्ये 'सैराट' चित्रपटाची टीम हजर राहिली होती. त्यामुळे मराठी चित्रपट आणि बॉलिवूडचा हा आदानप्रदान सोहळा सर्वांसाठी कौतुकाचा विषय ठरत आहे.