मुंबई: मोस्ट अवेटेड रियालिटी शो 'बिग बॉस'चं 11वं पर्व लवकरच सुरु होणार आहे. यासाठी स्पर्धकांची निवडही सध्या सुरु आहे. 10 पर्वाप्रमाणेच 11 पर्वात देखील सलमान खान हाच बिग बॉसमध्ये होस्ट असणार आहे. पण काही मीडिया रिपोर्टनुसार, या 11व्या पर्वानंतर सलमानचा कलर्स टीव्ही सोबतचा प्रवास थांबू शकतो.



मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सलमान खान सोनी टीव्हीवरील शो '10 का दम'च्या तिसऱ्या पर्वात होस्ट असू शकतो. तसंच यामध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, कलर्स टीव्हीकडून आतापासूनच 12व्या पर्वासाठी होस्टचा शोध सुरु झाला आहे.


असंही म्हटलं जात आहे की, आपल्या सिनेमांच्या प्रमोशनसाठी अनेकदा बिग बॉसमध्ये आलेला खिलाडी अक्षय कुमार या शोमध्ये होस्ट म्हणून दिसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याआधी देखील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता की, सलमान खान याच वर्षी '10 का दम'मध्ये होस्टची भूमिका बजावेल. पण आता आलेल्या बातमीनुसार सलमान 11व्या पर्वानंतर बिग बॉस आणि कलर्सला अलविदा करु शकतो.