मुंबई : सिनेनिर्माती एकता कपूर आपला अपकमिंग सिनेमा 'लिपस्टिक अंडर माय बुर्खा'च्या प्रमोशनसाठी नुकतीच कपिल शर्माच्या शोमध्ये आली होती. यावेळी तिने आपल्या मालिकांमधील पात्रांच्या मृत्यूच्या घटनांवर भाष्य करताना सुनील ग्रोव्हरवर निशाणा साधला.


कपिल शर्माने एकताला ज्योतिषविद्येसंदर्भातील प्रश्न विचारत, "आपल्या आयुष्यात सर्व उलथा-पालथ सरु,'' असल्याचं सांगितलं. त्यावर उत्तर देताना एकता म्हणाली की, "जर एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री माझा शो सोडून जाणार असेल, तर सुरुवातीला त्या पात्रासाठी योग्य रिप्लेसमेंट मी शोधत असते. पण जर योग्य रिप्लेसमेंट मिळत नसेल, तर त्या पात्राचा मृत्यू झाल्याचं दाखवते.'' एकताने या वक्तव्यातून सुनील ग्रोव्हरवर निशाणा साधल्याची चर्चा आहे.




16 मार्च रोजी कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर ऑस्ट्रेलियातून परतत असताना दोघांच्यातही विमानात टोकाचे वाद झाले होते. यानंतर सुनील ग्रोव्हरने कपिलच्या शोला रामराम ठोकला आहे.

दुसरीकडे कपिल शर्मानेही या वादाच्या पार्श्वभूमीवर चाहत्यांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्याने सुनील आपला चांगला मित्र असल्याचे सांगून, त्याला मी 2-3 वेळा भेटलो असल्याचं सांगितलं होतं. तसेच या घटनेचं पूर्ण सत्य कुणालाही माहिती नसून, योग्यवेळी आपण स्वत: याची माहिती देऊ असंही सांगितलं.

दरम्यान, सुनील ग्रोव्हरने कपिलच्या शोला रामराम ठोकल्यापासून कपिलचे ग्रह चांगलेच फिरले आहेत. कपिलच्या शोचा टीआरपी चांगलाच घसरत आहे.