मुंबई : हिंदी टेलिव्हिजन विश्वात खळबळ माजवणारा रिअॅलिटी शो 'बिग बॉस' आता मराठीत येणार आहे. बिग बॉसच्या अकराव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने याची अधिकृत घोषणा केली. विशेष म्हणजे मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखच्या हाती शोची सूत्रं दिली जाण्याची शक्यता आहे.
अभिनेत्री शिल्पा शिंदेने 'बिग बॉस 11'चं विजेतेपद पटकावलं. हीना खान, विकास गुप्ता, पुनिश शर्मा यांना टक्कर देत शिल्पाने जेतेपद मिळवलं. 'कलर्स मराठी' वाहिनीवर येत्या दोन महिन्यात हा कार्यक्रम सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिग बॉसचा सेट लोणावळ्यात तयार असल्यामुळे तिथेच शूटिंग होण्याची चिन्हं आहेत.
रितेश देशमुखने 'लय भारी' या चित्रपटातून मराठी सिनेविश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर 'विकता का उत्तर' या टीव्ही शोचं सूत्रसंचालनही त्याने केलं होतं. त्यामुळे बिग बॉस मराठीचा होस्ट म्हणून रितेशला पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरेल. बिग बॉस आणि वाद हे जणू समीकरणच आहे. त्यामुळे मराठीत हा शो आल्यावर कोणकोणते कलाकार यामध्ये सहभागी होणार, त्यांच्यातही टोकाचे वाद रंगणार का, असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
रविवारी रात्री 'बिग बॉस 11' च्या ग्रँड फिनालेमध्ये शिल्पाला ट्रॉफीसह 44 लाख रुपयांचं पारितोषिक प्रदान करण्यात आलं. अभिनेत्री हीना खान उपविजेती ठरली. विकास गुप्ताला तिसऱ्या तर पुनिश शर्माला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
बिग बॉसच्या अकरा पर्वांच्या इतिहासात पहिल्यांदाच मराठी स्पर्धक विजेता ठरला. त्यानंतर लागलीच 'मराठी बिग बॉस'ची घोषणा हा योगायोग म्हणावा लागेल. मराठी प्रेक्षकांचा बिग बॉसला वाढता प्रतिसाद पाहून ही जुळवाजुळव सुरु केल्याचं म्हटलं जातं.