मुंबई : मराठीतला गाजलेला रिअॅलिटी शो 'सारेगमप- घे पंगा कर दंगा'चा महाअंतिम सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात कल्याणच्या नचिकेत लेलेने दंगा घातला आहे.
12 स्पर्धकांना टक्कर देत कल्याणच्या नचिकेत लेलेने बाजी मारुन सारेगमपचं विजेतेपद पटकावलं आहे. तर यवतमाळचा उज्ज्वल गझधर ही दुसरी आली असून पुण्याच्या अक्षय घाणेकरने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
परीक्षक बेला शेंडे, स्वानंद किरकिरे, रवी जाधव आणि सूत्रसंचालक रोहित राऊतसोबत रविवारी (7 जानेवारी) हा महासोहळा पार पडला. सलग दहा तास लाईव्ह सुरु असलेल्या अंतिम फेरीत 12 स्पर्धकांमधून या पर्वाचा विजेता निवडण्यात आला.
12 स्पर्धकांनी गायलेली एकापेक्षा एक गाणी, नेत्रदीपक सादरीकरण, हटके परफॉर्मन्सने रसिकांची मनं जिंकली.
या सोहळ्याचं खास आकर्षण ठरला, तो म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार. अक्षय आणि सोनम कपूर ‘पॅडमॅन’च्या प्रमोशनसाठी सारेगमपच्या मंचावर आले होते. अक्षयने दादा कोंडके यांचं 'ढगाला लागली कळ' हे गाणं गाऊन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.