BIG BOSS 11 : शिल्पा शिंदे विजेती, हीना खानवर मात
एबीपी माझा वेब टीम | 15 Jan 2018 07:44 AM (IST)
विजेत्याची घोषणा करण्यापूर्वी दहा मिनिटं व्होटिंग लाईन्स सुरु करण्यात आल्या होत्या. त्यावेळी शिल्पा आणि हीनाच्या चाहत्यांमध्ये कांटे की टक्कर सुरु झाली.
मुंबई : 105 दिवस, 19 स्पर्धक आणि असंख्य टास्क्स.. यांना पार करत अभिनेत्री शिल्पा शिंदेने 'बिग बॉस 11'चं विजेतेपद पटकावलं आहे. प्रत्येक सिझनप्रमाणे बिग बॉसचं यंदाचं पर्वही अनेक वादांमुळे गाजलं होतं. हीना खान, विकास गुप्ता, पुनिश शर्मा यांना टक्कर देणाऱ्या शिल्पाच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडली. रविवारी रात्री 'बिग बॉस 11' च्या ग्रँड फिनालेमध्ये शिल्पाला ट्रॉफीसह 44 लाख रुपयांचं पारितोषिक प्रदान करण्यात आलं. अभिनेत्री हीना खान उपविजेती ठरली. विकास गुप्ताला तिसऱ्या तर पुनिश शर्माला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. होस्ट सलमान खानच्या सूत्रसंचालनामुळे ग्रँड फिनाले रंजक झाला. विजेत्याची घोषणा करण्यापूर्वी दहा मिनिटं व्होटिंग लाईन्स सुरु करण्यात आल्या होत्या. त्यावेळी शिल्पा आणि हीनाच्या चाहत्यांमध्ये कांटे की टक्कर सुरु झाली.