मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चं 12वं सीजन येत्या 16 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. 'बिग बॉस'चं नवं सीजनही बॉलिवूडचा सुल्तान सलमान खान होस्ट करणार आहे. बिग बॉसच्या 12व्या सीजनची घोषणा होण्याआधी यंदाच्या सीजनसाठी सलमानच्या मानधनात वाढ होणार नाही, अशा बातम्या येत होत्या. मात्र सलमानच्या मानधनात वाढ झाल्याचं आता समोर आलं आहे.


सलमान खानने गेल्या वर्षी बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी 11 कोटी रुपये मानधन घेतलं होतं. मात्र नव्या रिपोर्टनुसार, सलमानला बिग बॉसच्या 12व्या सीजनसाठी एका एपिसोडसाठी 14 कोटींचं मानधन मिळणार आहे.


सलमानला एवढं मानधन 'बिग बॉस'चे निर्माते का देतात? असा प्रश्न सर्वांना पडला असेल. मात्र बिग बॉसच्या 'वीकेन्ड का वार' एपिसोडची लोकप्रियता मोठी आहे. यामध्ये शनिवार आणि रविवार सलमान बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी संवाद साधतो आणि आठवडाभरातील घरातील घडमोडींचा आढावा घेतो. या भागात सलमान ज्या पद्धतीने स्पर्धकांची फिरकी घेतो ते पाहायला प्रेक्षकांना आवडतं.


बिग बॉसच्या निर्मात्यांनी शो सुरू होण्याच्या दहा दिवस आधीच सलमानसोबत लॉन्च इव्हेंट केला. यामध्ये सलमानने 'बिग बॉस'ची पहिली स्पर्धक जोडी भारती आणि हर्ष यांची प्रेक्षकांना ओळख करुन दिली.


बिग बॉसच्या घरात यावेळी अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. या सीजनमध्ये नेमके काय बदल आहेत हळूहळू स्पष्ट होईल. यंदाच सीजन रात्री 10.30 वाजता टेलिकास्ट न होता, रात्री 9 वाजता टेलिकास्ट होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक आता बिग बॉस सुरू होण्याची वाट पाहत आहेत.