कपिलला सैराटची भुरळ, द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी
एबीपी माझा वेब टीम | 04 Jun 2016 07:30 AM (IST)
मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माचा लोकप्रिय कार्यक्रम 'द कपिल शर्मा शो'मध्ये महाराष्ट्रासह देशाला 'याड लावणाऱ्या' सैराट चित्रपटाची टीम येणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेंसह रिंकू राजगुरु, आकाश ठोसर आणि इतर कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. आतापर्यंत कपिल शर्माच्या शोमध्ये फक्त बॉलिवूडमधील चित्रपट कलाकारांना निमंत्रित केलं जात असे. मात्र बॉलिवूडला दखल घ्यायला लावणाऱ्या सैराटच्या यशानंतर आता पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाच्या टीमला कपिलच्या शोमध्ये पाचारण करण्यात येईल. कपिलच्या कार्यक्रमात ‘सैराट’ची टीम उपस्थित राहणार असल्याचे जवळपास निश्चित असले तरी कार्यक्रमाचे चित्रिकरण अद्याप झालेले नाही. यासोबतच हा कार्यक्रम केव्हा टेलिकास्ट होणार याबाबतही कोणतीही माहिती नाही. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या आणि मराठी सिनेसृष्टीत कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढणाऱ्या ‘सैराट’ने नवा उच्चांक गाठला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ने आतापर्यंत 80 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मराठी सिनेमाने इतकी कमाई केलेला हा पहिलाच सिनेमा आहे.