Sahkutumb Sahaparivar : छोट्या पडद्यावरील सहकुटुंब सहपरिवार (Sahkutumb Sahaparivar) ही मालिके गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेतील मोरे कुटुंब, मालिकेचे कथानक आणि मालिकेमधील कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या मालिकेनं 900 भागांचा टप्पा गाठला आहे. आज या मालिकेचा 900 वा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
मालिकेच्या 900 भागांनिमित्त स्टार प्रवाहची पोस्ट
स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, 'आज सादर होत आहे 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेचा 900 वा भाग.... आपण या 900 भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!! त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!!आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..!' या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी या मालिकेच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
मोरे कुटुंबाची गोष्ट
सहकुटुंब सहपरिवार या मालिकेमध्ये मोरे कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. सूर्यकांत या कुटुंबाचा प्रमुख आहेत. सूर्यकांतला वैभव, ओंकार आणि प्रशांत असे तीन धाकटे भाऊ आहेत. या मालिकेत अभिनेता सुनील बर्वे (Sunil Barve) हा सूर्यकांत मोरे ही भूमिका साकारत आहे तर अभिनेत्री नंदिता पाटकर (Nandita Patkar) ही सरिता सूर्यकांत मोरे ही भूमिका साकारत आहे. नंदिता आणि सुनील यांच्यासोबतच अमेय बर्वे,साक्षी गांधी,किशोरी अंबिये,सुहास परांजपे,संतोष पाटील,महेश घाग,आकाश नलावडे,आकाश शिंदे,कोमल कुंभार,भाग्यश्री पवार या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
सहकुटुंब सहपरिवार या मालिकेची टीम सोशल मीडियावर या मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. सहकुटुंब सहपरिवार मालिकेच्या आगामी एपिसोड्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. या मालिकेच्या 900 व्या भागात काय दाखवण्यात येणार आहे, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. सहकुटुंब सहपरिवार या मालिकेसोबतच स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा, आई कुठे काय करते या मालिकांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :