अभिनेत्री देवोलीनाचं बँक अकाऊंट हॅक, हजारो रुपयांची चोरी
एबीपी माझा वेब टीम | 28 Mar 2018 01:32 PM (IST)
याआधी अभिनेता नकुल मेहतासोबतही असाच प्रकार घडला होता. त्याच्या अकाऊंटमधून मोठी रक्कम दुसऱ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झाली होती.
मुंबई : ऑनलाईन ट्रान्झॅक्शनदरम्यान बँक फ्रॉड होणं हे आता काही नवं नाही. सामान्यच नाही तर कलाकारही या ऑनलाईन फ्रॉडचे बळी पडत आहेत. बँक अकाऊंटमधून पैसे चोरल्याचा प्रकार ‘साथ निभाना साथिया’ या हिंदी मालिकेत गोपी बहूची भूमिका साकारणारी अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीसोबत घडला आहे. आज सकाळी बँक अकाऊंटमधून 16 हजार काढल्याचा मेसेज आल्यानंतर देवोलीनाला धक्काच बसला. देवोलीना म्हणाली की, “मेसेज चेक करताना बँक अकाऊंटमधून व्यवहार झाल्याचा मेसेज मला दिसला. माझ्या अकाऊंटमधून 16 हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. शॉपिंगसाठी पैसे खर्च केले की आणखी कुठेतरी, हे सुरुवातीला मला आठवत नव्हतं. पण नंतर कळलं की, माझं अकाऊंट हॅक झालं आहे.” “पैसे सॅन फ्रान्सिस्कोला ट्रान्सफर झाल्याचं ट्रान्झॅक्शनमध्ये दिसत आहे. मी माझं अकाऊंट ब्लॉक केलं असून बँकेला याबाबत माहिती दिली आहे,” असंही देवोलीनाने सांगितलं. तसंच क्रेडिट कार्ड वापरताना काळजी घ्या, असा सल्लाही तिने दिला. याआधी अभिनेता नकुल मेहतासोबतही असाच प्रकार घडला होता. त्याच्या अकाऊंटमधून मोठी रक्कम दुसऱ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झाली होती.