मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मोहन जोशी पॅनलतर्फे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची घोषणा झाल्याने, आता ही लढत चांगलीच रंगणार आहे. येत्या 6 एप्रिल रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.


टीव्हीवर संभाजी मालिकेतून दमदार एन्ट्री केल्यानंतर, मागील आठवड्यात नाट्य परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने डॉ. अमोल कोल्हे चर्चेत आले होते. आता ‘आपलं पॅनल’च्या प्रसाद कांबळी व्हर्सेस मोहन जोशी पॅनलच्या अमोल कोल्हे असा डाव रंगणार हे उघड आहे. पण ते असतानाच कोल्हेंनी एक मेसेज व्हायरल करुन पुन्हा एकदा आपल्याकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा राजकीय आखाडा होऊ नये. सर्वांनी एकोप्याने राहावं आणि संख्याबळाच्या फंदात न पडण्याचा विचार डॉ. अमोल कोल्हेंनी केला. समग्र महाराष्ट्राचा व्यापक विचार करत, कोल्हे यांनी समन्वयाचा प्रस्ताव पुढे केला म्हणे. म्हणे.. अशासाठी की त्यांच्या नावे असे मेसेज मोहन जोशी पॅनलच्याच मंडळींनी सर्वत्र फॉरवर्ड केले. पुढे या मेसेजमध्ये असंही म्हटलंय की दुर्दैवाने या प्रस्तावावर काहीही उत्तर आलं नाही. त्याचवेळी मी अजूनही आशावादी असल्याचं ते म्हणतात.

हा मेसेज फॉरवर्ड झाल्यावर प्रसाद कांबळी यांची बाजू समजून घेत लगोलग घाईघाईत याच्या अनेकांनी बातम्या केल्या. पण मुद्दा असा की डॉक्टरसाहेबांनी जो मेसेज केला आणि त्यात समन्वयाच्या प्रस्तावाबाबात जे काही सांगत आहेत, तो प्रस्ताव त्यांनी कोणापुढे ठेवला होता?  कधी ठेवला होता? त्याचा साधा काही पुरावा वगैरे? याचा त्या निरोपात कुठे उल्लेखही नाही.

याबाबत एबीपी माझाने सतत चार दिवस डॉ. कोल्हेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आधी फोन केले, ते उचलले नाहीत म्हणून नंतर मेसेजवरुन निरोप पाठवले. तरीही डॉक्टरांना सवड काही मिळेना.

कदाचित बिझी असल्याने डॉक्टरांनी नाट्यसंमेलनाला, नाट्यपरिषदेच्या कार्यक्रमांना फारशी हजेरी लावली नाही. पण जेव्हा नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदावर दावा ठोकता तेव्हा त्यांनी बोलायला हवं. बरं स्वत: बोलले नाही तरी समोरुन जेव्हा विचारणा होते, तेव्हा उत्तर द्यायला हवं, अशी अपेक्षा असते.