मुंबई : बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा झाल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला. बाबा राम रहीमची काळी कृत्यं जगासमोर आल्यानंतर, धर्माच्या आड सुरु असलेला धंदा बंद झाला आणि साध्वींना न्याय मिळाला, अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राम रहीमच्या शिक्षेवर आनंद व्यक्त करणाऱ्यांमध्ये कॉमेडियन किकू शारदाचाही समावेश आहे.


राम रहीमला 20 वर्षांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेची घोषणा झाल्यानंतर कीकू शारदाने खिल्ली उडवणारं ट्वीट केलं आहे. किकू शारदाने लिहिलं आहे की, एन्जॉईंग अ पीसफूल चायनीज मिल विद नो मोनोसोडियम ग्लूटामेट. (Enjoying a peaceful Chinese meal with no monosodium glutamate.)

https://twitter.com/kikusharda/status/902112429928202240

इथे मोनोसोडियम ग्लूटामेट म्हणजे MSG हे बाबा राम रहीमच्या संदर्भात लिहिलं आहे. राम रहीम स्वत:ला मेसेंजर ऑफ गॉड म्हणजे MSG म्हणत असे. कीकूच्या ट्वीटमध्ये ज्या मोनोसोडियम ग्लूटामेटचा उल्लेख आहे, ते बहुतांश वेळा चायनीज फूडमध्ये चव वाढवण्यासाठी मिसळलं जातं.

किकू आणि बाबा राम रहीमचा वाद
'कॉमेडी नाईट्स विद कपिल' शोमध्ये एकदा किकू शारदाने राम रहीमचा वेश परिधान करुन त्याच्या एका सिनेमातील दृश्याची नक्कल केली होती. यानंतर बाबा राम रहीमचे समर्थक भडकले होते. किकूने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला होता. बाबा राम रहीमने किकू शारदाला नोटीसही पाठवली होती. यानंतर किकूवर गुन्हाही दाखल झाला होता. त्याला अटक करुन एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली होती.

चंद्रमुखी चौटालाच्या ट्वीटनंतर किकूवर अभिनंदनाचा वर्षाव
बाबा राम रहीमच्या अटकेनंतर कीकू शारदावर ट्विटवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याची सुरुवात एफआयआर फेम चंद्रमुखी चौटाला अर्थात कविता कौशिकने केली. कविताने बाबा राम रहीमच्या अटकेनंतर किकूला ट्वीट करुन शुभेच्छा दिल्या. तिचं ट्वीट तुफान रिट्वीट झालंच, शिवाय व्हायरल पण झालं.

https://twitter.com/Iamkavitak/status/901077136630403072

कविताने किकूला टॅग करताना ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "किकू शारदा तुला माहित आहे ना, माझा आवडता डायलॉग कोणता आहे? आज...खुश तो बहुत होंगे तुम!" कविताने ट्वीट करताच किकूला शुभेच्छा देण्यासाठी ट्विटवर चढाओढ लागली. किकू आणि कविताचे फॉलोअर्स किकूला शुभेच्छा देऊ लागले.