Raj Thackeray In Khupte Tithe Gupte : 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सहभागी होणार आहेत. 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमातील राज ठाकरेंचे वेगवेगळे प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अवधूत गुप्तेनेदेखील (Avadhoot Gupte) राज ठाकरे यांच्याबद्दल खास पोस्ट शेअर केली आहे. 


अवधूत गुप्तेच्या पोस्टने वेधलं लक्ष


अवधूत गुप्तेने 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमातील राज ठाकरेंसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने खास कॅप्शन लिहिलं आहे. त्याने लिहिलं आहे,"मी, ते (राज ठाकरे) आणि ती (खुर्ची).... 4 जूनला रात्री 9 वाजता! आता प्रत्येक रविवार... धारधार!". अवधूत गुप्तेच्या या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अवधूतच्या या पोस्टवर "चार तारखेची धार डबल आहे...गुप्ते सर जरा जपूनच", अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 




जुन्या आठवणीत राज ठाकरे भावूक!


'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या नव्या प्रोमोमध्ये अवधूत गुप्ते राज ठाकरेंना काही जुने फोटो दाखवताना दिसत आहे. या फोटोंमध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दिसत आहेत. त्यांच्यातला जिव्हाळा या फोटोंमध्ये दिसून येत आहे. हे फोटो दाखवल्यावर अवधूत गुप्तेने त्यांना विचारलं की," काय वाटतं हे सगळं एकत्र पाहून?" यावर राज ठाकरे म्हणाले,"खूप छान दिवस होते ते. माहीत नाही मला.. कोणीतरी विष कालवलं किंवा नजर लागली." यावर अवधूत म्हणाला, "आता परत येऊ नाही शकणार…" 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा हा प्रोमो चांगलाच चर्चेत आहे. 


'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील लोक हजेरी लावणार आहेत. आता या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राज ठाकरे यांना कोणते प्रश्न विचारण्यात येणार आहेत? हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.  4 जून 2023 रोजी रविवारी 9 वाजता 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 


'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील लवकरच हजेरी लावणार आहेत. काही दिवसांपूर्वी 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, 'खुपते तिथे गुप्ते'  कार्यक्रमातील प्रश्नांना खूप धार आहे, पण मी पण तयार आहे.' या प्रोमोला कॅप्शन देण्यात आलं होतं, "प्रश्नांना कितीही असो धार माननीय मुख्यमंत्री आहेत तयार."


संबंधित बातम्या


Khupte Tithe Gupte : 'खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात अजित पवार यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, 'बारामतीमधून काकांनी हात बाजूला केला तर यांचं काय होईल?'; प्रोमो व्हायरल