Raj Thackeray In Khupte Tithe Gupte : लोकप्रिय गायक, दिग्दर्शक आणि निर्माता असलेला अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमांचं नवं पर्व लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात राज ठाकरे (Raj Thackeray) हजेरी लावणार आहेत.
'खुप्ते तिथे गुप्ते'ची घोषणा झाल्यापासून या कार्यक्रमाच्या नव्या पर्वासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता या नव्या पर्वाच्या पहिल्या भागात महाराष्ट्राचं मोठं व्यक्तिमत्त्व असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजेरी लावणार आहेत. नुकतचं या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण झालं आहे.
झी मराठीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका बड्या राजकीय नेत्याने 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात हजेरी लावल्याचं दिसत आहे. पायात लेदरची मोजडी, अंगावर खादीचा कुर्ता आणि वागण्यात रुबाब असा काहीसा लूक असलेला एक नेता दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं…? या प्रश्नोत्तरांच्या खुर्चीत बसणारे पहिले वहिले व्यक्तिमत्त्व कोण?, असं म्हणत झी मराठीने हा प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडीओवर, राजकीय नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे, साहेब, सगळ्यांचे फेव्हरेट राज साहेब, महाराष्ट्राचा बुलंद आवाज...राज ठाकरे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. या प्रोमोमध्ये राज ठाकरेंचा चेहरा दिसत नसला तरी देहयष्टीवरुन चाहत्यांनी अंदाज वर्तवला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या प्रत्येक भाषणाला गर्दी होत असते. त्यांची बोलण्याची शैली चाहत्यांच्या पसंतीस उतरते. त्यांच्या प्रत्येक भाषणात नावीण्य असतं. त्यामुळे आता 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात राज ठाकरे हजेरी लावणार असल्याने हा भाग पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
'खुपते तिथे गुप्ते'चा पहिला भाग कधी पार पडणार?
'खुपते तिथे गुप्ते' हा कार्यक्रम 4 जूनपासून सुरु होणार आहे. 4 जून 2023 पासून दर रविवारी रात्री 9 वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता राज ठाकरे विशेष 'खुपते तिथे गुप्ते' हा भाग 4 जूनलाच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवधूत गुप्ते खुपणारी गोष्ट बेमालूमपणे व खुबीने समोर आणणार आहे. 'खुपते तिथे गुप्ते'चं हे पर्व वेगळं असणार आहे. या पर्वाचं खास आकर्षण एक खास खुर्ची असणार आहे. या खुर्चीसाठी सगळीकडे चढाओढ पाहायला मिळणार आहे. नोकरदार, कॉर्पोरेट आणि राजकारणी मंडळींमध्ये खुर्चीसाठीची ही चढाओढ पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या