मुंबई : बिग बॉसचा फिनाले जसजसा जवळ येत आहे तसतसा घरातील खेळ अधिक रंजक होत चालला आहे. बिग बॉसच्या घरात कर्णधारपदासाठी प्रत्येक आठवड्याला एक कार्य दिले जाते. या आठवड्यातील कर्णधारपदासाठी बिग बॉसने घरातील सदस्यांना 'ध्वज विजयाचा उंच धरा रे' हे कार्य दिले होते. या साप्ताहिक कार्यात पुष्कर जोगनं बाजी मारत कर्णधारपद पटकावलं.

कर्णधारपदासाठीच्या या कार्यामध्ये प्रत्येक उमेदवाराला 5 झेंडे देण्यात आले होते. आस्तादला तांबडा, मेघाला गुलाबी तर पुष्करला पिवळा अशा रंगात झेंड्यांची विभागणी करण्यात आली होता. इतर स्पर्धकांची 3 वेगवेगळ्या गटात विभागणी केली. या गटांनी स्पर्धकांना साथ देत त्यांच्या झेंड्यांचे रक्षण करायचे होते. जो स्पर्धक गार्डन एरियात सर्वात जास्त झेंडे रोवणार तोच या कार्यात विजयी ठरणार हे स्पष्ट होते.

आस्ताद काळे, मेघा धाडे आणि पुष्कर जोग हे तिघे कर्णधारपदाच्या शर्यतीत होते. तर उषा नाडकर्णी या कार्यच्या संचालिक होत्या. बिग बॉसच्या या आठवड्याच्या बाद प्रक्रियेत शर्मिष्ठा राऊत, भूषण कडू, स्मिता गोंदकर हे स्पर्धक आहेत. तर यांपैकी विकेंडच्या डावात कोण जाणार याकडे सर्वांनचेच लक्ष लागले आहे.