दोनच दिवसांपूर्वी वैद्यकीय चाचण्यांसाठी सुशांतला बिग बॉसच्या घरातून बाहेर नेण्यात आले होते. त्यानंतर सुशांतने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सुशांत काही दिवसांनी शोमध्ये पुनरागमन करु शकतो, असंही म्हटलं जात आहे.
सुशांतला सिव्हिअर अॅसिडीटीचा त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे.
भूषण कडूला कन्फेशन रुममध्ये बोलावून बिग बॉसनी याविषयी कल्पना दिली. त्यानंतर सुशांतचं सामान त्याच्या बॅगांमध्ये भरुन नावाच्या पाटीसह स्टोअर रुममध्ये जमा करण्यात आलं.
सुशांत अनेक वेळा कुटुंबीयांच्या आठवणींना व्याकुळ झालेला प्रेक्षकांनी पाहिला आहे. काही वेळा सुशांतचा पारा चढल्याचंही दिसलं आहे. आता प्रकृती खालावल्यामुळे सुशांत बिग बॉसच्या घरातून बाहेर गेला आहे.
यापूर्वी ऋतुजा धर्माधिकारीनेही वैद्यकीय कारणांमुळे स्पर्धा सोडली होती. सुशांत हा मेडिकल कारणामुळे स्पर्धा सोडावा लागलेला दुसरा स्पर्धक ठरला आहे. सुशांतच्या गच्छंतीनंतर घरात 11 स्पर्धक राहिले आहेत.
काही आठवड्यांपूर्वी अभिनेत्री हर्षदा खानविलकर बिग बॉसच्या घरात आली होती. मात्र ती केवळ पाहुणी म्हणून स्पर्धेत सहभागी झाली होती.
आतापर्यंत आरती सोळंकी, विनित बोंडे, अनिल थत्ते, राजेश शृंगारपुरे, ऋतुजा धर्माधिकारी, जुई गडकरी, सुशांत शेलार हे सात स्पर्धक घराबाहेर गेले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला 15 स्पर्धक सहभागी झाले होते, तर तिघांना वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली आहे.
मेघा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग, उषा नाडकर्णी, आस्ताद काळे, रेशम टिपणीस, भूषण कडू, स्मिता गोंदकर या आठ स्पर्धकांशिवाय वाईल्ड कार्ड एन्ट्रीने आलेले शर्मिष्ठा राऊत, त्यागराज खाडिलकर, नंदकिशोर चौगुले हे तिघे जण सध्या घरात आहेत.
या आठवड्यात मेघा, उषा, आस्ताद, रेशम, भूषण आणि त्यागराज हे सहा स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. त्यापैकी येत्या रविवारी कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.