मुंबई : अभिनेत्री प्रिया बापटची 'सिटी ऑफ ड्रीम्स' ही वेबसीरिज सध्या चांगलीच गाजत आहे. प्रियाच्या भूमिकेचं कौतुक होत असतानाच त्यातील एक मिनिटाच्या बोल्ड सीनची व्हिडीओ क्लीप प्रचंड व्हायरल झाली आहे. याबाबत प्रियाने 'एबीपी माझा'शी मनमोकळा संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.


'सिटी ऑफ ड्रीम्स'मधील 'त्या' दृश्याला बोल्ड सीन म्हणणं प्रियाला पटत नाही. 'तुम्ही वेब सीरिजचे दहा एपिसोड बघा. संपूर्ण साडेआठ तासांच्या सीरिजमध्ये तो फक्त एका मिनिटाचा सीन आहे. त्या दृष्यामागे काही कारणं आहेत, संपूर्ण वेब सीरीजमध्ये त्याचा संदर्भ आहे. तुम्ही कामाबद्दल बोला. एका सीनवरुन माणसाला, त्याच्या चारित्र्याला किंवा अभिनय क्षमतेला जज करु नका', असा सल्ला प्रिया बापटने दिला.



प्रिया बापट 'सिटी ऑफ ड्रीम्स' पौर्णिमा गायकवाड ही व्यक्तिरेखा साकारत आहे. परिश्रम घेण्याची तयारी असलेली ही महत्त्वाकांक्षी तरुणी आहे. मात्र या भूमिकेसाठी राजकारणाच्या अभ्यासाची आवश्यकता नव्हती, असं प्रिया म्हणाली. देहबोलीचा अभ्यास केला, खूप जणांची भाषणं ऐकली असं सांगतानाच आपल्यावर 'उंबरठा'मधील स्मिता पाटील यांचा प्रभाव असल्याचंही प्रिया आवर्जून सांगते.

वेब सीरिज हे वेगळं माध्यम एक्स्प्लोअर करायचं होतं. अभिनेत्री म्हणून स्वतःला चॅलेंज करायला आवडतं. सिनेमासारखं सलग दोन तास नाही, किंवा मालिकांसारखं युगानुयुगं चालत नाही. मी मला वेळ मिळेल तेव्हा, हवं तिथे बघू शकते, माझ्यासोबत घरच्यांना पाहण्याचं बंधनही नाही, हा वेब सीरिजचा फायदा असल्याचं प्रियाला वाटतं.

नागेश कुकूनूरसोबत काम करण्याचा अनुभव 'अमेझिंग' होता, असं प्रिया सांगते. या वेब सीरिजमध्ये प्रियासोबत सिद्धार्थ चांदेकर, सचिन पिळगांवकर, अतुल कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, उदय टिकेकर यासारखे मराठमोळे चेहरे झळकत आहेत.