मुंबई : बहुप्रतीक्षित 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सिझनचा मुहूर्त ठरल्याचं म्हटलं जात आहे. 19 मे पासून बिग बॉसचं दुसरं पर्व सुरु होणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप 'कलर्स मराठी' वाहिनीकडून या चर्चेला दुजोरा देण्यात आलेला नाही.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात हा शो सुरु होईल, अशी अटकळ प्रेक्षकांनी बांधली होती. मात्र लोकसभा निवडणुकांमुळे या तारखा पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर मे महिन्यात बिग बॉस मराठी सुरु होण्याची चर्चा होती, परंतु तारीख निश्चित होण्यास विलंब होत होता.

'बिग बॉस मराठी 2' चा पहिला एपिसोड रविवार 19 मे रोजी प्रक्षेपित होणार असल्याची माहिती आहे. या दिवशी पर्वातील सर्व स्पर्धकांची ओळख परेड होईल. या भागाच्या चित्रीकरणाला 16 मेपासून सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईतील गोरेगावमधील फिल्म सिटीमध्ये 'बिग बॉस मराठी'चा सेट उभारण्यात येत आहे


'बिग बॉस'च्या या नव्या सीझनमध्ये कोणते कलाकार झळकणार याची जोरदार चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. तीन प्रोमोंमुळे लावणी, राजकारण आणि कीर्तन या क्षेत्रातील मंडळी दिसणार असल्याचे संकेत आहेत. दुसऱ्या पर्वातही महेश मांजरेकरच सूत्रसंचालन करताना दिसतील.

'खुलता कळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुखला बिग बॉसमध्ये सहभागासाठी विचारणा झाली होती, मात्र तिने हा प्रस्ताव नाकारल्याची माहिती आहे.

'बिग बॉस मराठी 2' मध्ये 'या' स्पर्धकांच्या नावाची चर्चा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर
कीर्तनकार इंदुरीकर महाराज
अभिनेत्री रसिका सुनिल
अभिनेत्री अर्चना निपणकर