Premachi Goshta Serial Update :  'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे. कार्तिक मुक्तावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, मुक्ताच तुरुंगात जाणार आहे. सागर मुक्ताची जामिनावर सुटका करतो. पण, त्याच वेळी मुक्ताला तुरुंगात डांबणाऱ्याला सोडणार नसल्याचे सांगतो. आजच्या एपिसोडमध्ये नवीन वळण येताना दिसणार आहे. 


कार्तिकचा मुक्तावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न


क्लिनिकमधून मुक्ता घरी येते तेव्हा घरात अंधार करून कार्तिक बसलेला असतो. कार्तिक मुक्ताशी लगट करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी मुक्ता त्याच्या कानशिलात तीन वेळा मारते. आरतीला फसवल्यासाठी, माझ्यावर वाईट नजर टाकण्यासाठी हे मारत असल्याचे मुक्ता सांगते. मुक्ताकडून प्रतिकार सुरू असतानाही कार्तिक मुक्ताशी लगट करण्याचा प्रयत्न करतो. 
तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नसल्याचे कार्तिक सांगतो. मीच तुझा तारणहार आहे, खूप दिवसांपासून संधी शोधत होतो, आता मला ही संधी मिळाली असून त्याचे सोनं करुयात असे म्हणत कार्तिक मुक्तावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो. मुक्ता त्याचा प्रतिकार करत असताना या प्रसंगातून वाचण्यासाठी सागरचे नाव घेऊन आरडाओरड करते.  


सागर घरी आल्यावर... 


आदित्यच्या घरून सागर आपल्या घरी येतो तेव्हा त्याला सगळे चिंतेत असल्याचे दिसते. लकी, बापू, इंद्रा, स्वाती, कार्तिक सगळे घरी चिंता करत बसलेले असतात. मुक्ता घरी नसल्याचे इंद्रा सांगते. आम्ही तिचेही मुव्हीचे तिकीट काढले होते. पण ती आलीच नाही असे सांगत इंद्रा मुक्तावर चिडते. इंद्राची चिडचिड सुरू असते. सागर मुक्ताची विचारपूस करण्यासाठी क्लिनिकला फोन करतो. मात्र, ती क्लिनिकमधून आधीच एक-दीड तास आधीच निघाली असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सागरची चिंता वाढते.  


मुक्ताला तुरुंगात पाहून सागरला बसला धक्का...


मुक्ताला शोधण्यासाठी सागर घराबाहेर पडतो. अनेक ठिकाणी शोध घेऊनही मुक्ता सापडत नाही. त्यामुळे अखेर सागर मिसिंग तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जातो. त्यावेळी मुक्ता तुरुंगात असल्याचे पाहून त्याला धक्काच बसतो. सागरला पाहून तुरुंगात असलेल्या मुक्ताच्या अश्रूंचा बांध फुटतो. 


मुक्ताविरोधात पोलीस तक्रार करण्यात आल्याचे पोलीस सांगतात. मुक्ताने तिच्या क्लिनिकमधील सहकारी आरतीला मारहाण, छळ केली असल्याची तक्रार आहे. त्यासाठी तिला तुरुंगात टाकण्यात आले असल्याचे पोलीस सांगतात. मुक्ताला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी वकीलाला सांगून जामीन घ्यायला पोलीस सुचवतात. सागर मुक्ताला धीर देतो. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे सागर सांगतो. सागरचे वकील मुक्ताच्या जामिनाची व्यवस्था करतात. तुमचं तुमच्या पत्नीवर खूपच प्रेम आहे, असे पोलीस सागरला सांगतात. 


कार्तिकच्या कटाने मुक्ता तुरुंगात, सावनीने दिला इशारा... 


तर, इकडे घरी मुक्ता आली नसल्याचे पाहून घरात चिंतेचे वातावरण असते. इंद्रा मुक्ताला बोल लावत असते. कार्तिकचे चांगले वागण्याचे नाटक सुरू असते. आपण मुक्ताला शोधण्यासाठी जात असल्याचे सांगतो. पण, तो घराबाहेर पडताच सावनीला फोन करतो. मुक्ताला तुरुंगात डांबले असल्याचे कार्तिक सांगतो. मुक्ताची पोलीस तक्रार करायला कोणी सांगितले असे सावनी सांगते. तू जे काम केलंय तेच आपल्यावर उलटणार असल्याची भीती सावनी व्यक्त करते. सागर आणि मुक्ता तुझ्या मागे हात धुवून लागणार असल्याचा इशारा सावनी सागरला देते. कार्तिक आरतीला धमकी देऊन मुक्ताच विरोधात तक्रार देण्यासाठी दबाव टाकतो. त्यामुळे मुक्ताला तुरुंगात जावे लागते. 


मुक्ताच्या दोषीला सोडणार नाही... 


सागर मुक्ताला घेऊन घरी येतो. त्यावेळी मुक्ता सागरला पाहून कार्तिक घाबरतो. तर, इंद्रा मुक्तावर चिडते आणि तिला उलटसुलट बोलण्यास सुरुवात केले. त्यावर सागर इंद्राला, काय घडलं हे माहित नसताना काहीही बोलू नकोस असे सांगतो. मुक्ता तुरुंगात होती  असे सागर घरी सांगतो. मुक्ताला तुरुंगात का जावं लागलं याचे कारण सागर सांगतो. या प्रकरणाचा छडा लावणारच असे सागर सांगतो.