Premachi Goshta Serial Update :  'प्रेमाची गोष्ट'  (Premachi Goshta) मालिकेत  आजचा एपिसोड  हा खरं  प्रेम कोणते हे दाखवणारे आहे. एका बाजूला नाती,नात्यातील आपलेपण आहे. तर दुसरीकडे स्वार्थी विचाराने प्रेमाचा वापर करणारे आहेत. सावनीवर हर्षवर्धनचे स्वार्थी प्रेम असते. तर, दुसरीकडे सागर-मुक्ता आपल्या नात्याला महत्त्व देत घर सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.


आदित्य-सई सोबत मुक्ताही खेळणार


सागर मुक्ताचे कौतुक करताना तिला जादूगार म्हणतो. मी काय जादू केलीय असे मुक्ता विचारते. त्यावर आदित्यने हर्षवर्धनऐवजी मला पप्पा म्हणून हाक मारली असल्याचे  सागर आनंदाने म्हणतो. माझ जेवढा जीव सईवर आहे, तेवढाच जीव आदित्यवर आहे. तुमच्या दोघांमधील दरी कमी होत असून जवळ येत आहात, याचा आनंद वाटत असल्याचे मुक्ता सागरला सांगते.


मैदानात खेळत असताना आदित्य सागरला खेळायला बोलावतो. आदित्यने बोलावल्याने सागरही आनंदाने खेळतो पण तो मुक्तालाही खेळण्यासाठी बोलावतो. मुक्ता-सई आणि आदित्य-सागर यांची टीम होते आणि क्रिकेट खेळतात.


लग्नाच्या विचाराने सावनी झालीय आनंदी


इकडं हर्षवर्धनने सावनीला म्हणतो की, ''तुझे आदित्यकडे काहीच लक्ष नाही. आदित्य हा सागरच्या जवळ जात आहे. त्याने मला पप्पा म्हणून हाक मारण्यास नकार दिला. असेच सुरू राहिले तर तोही दुरावेल. आपल्या हातात काहीच राहणार नाही असे हर्षवर्धन म्हणतो. त्यावर सावनी म्हणते असे काही होणार नाही. मी त्याला समजावून सांगेल. 


सावनी आपल्या लग्नाबाबत खूपच उत्साही असते. हनिमूनला कुठे जाणार, हर्षवर्धन तुझ्या नावाची मेहंदी लावणार, मंगळसूत्र घालणार असल्याचा आनंद असल्याचे सावनी त्याला सांगते. तुझे मित्र, परिचित सांगायचे की  हर्षवर्धन तुला धोका देणार, कधीही लग्न करणार नाही. पण, मी आता त्या सगळ्यांना उत्तर देणार असून अखेर हर्षवर्धनने माझ्यासोबत लग्न केले असल्याचे त्यांना दाखवून देणार असल्याचे सावनी हर्षवर्धनला सांगते. जे माझे आहे, ते तुझं होणार आहे. जे तुझं आहे ते माझं होणार. एक स्वप्न पूर्ण होत असल्याचे सावनी सांगते. सावनीच्या या वक्तव्याने भविष्यात सावनीला सोडून दिल्यास माझ्या संपत्तीतील वाटा हा द्यावा लागेल असा विचार हर्षवर्धनच्या मनात येतो आणि चिंतेत पडतो. 


सावनीला संपत्तीतून करणार बेदखल, हर्षवर्धन टाकणार डाव


सावनीसोबतच्या लग्नाच्या विचाराने हर्षवर्धन चिंतेत असतो. सावनीचे प्रेम हे कडक कॉफीसारखे झाले असून ती आंधळ्या प्रेमात असलेल्या प्रेमी युगुलासारखी वागत असल्याचे हर्षवर्धन सांगतो. मी मेहनतीने कमावलेल्या प्रॉपर्टीवर ती तिचा हक्क सांगतेय याची चीड व्यक्त करतो. लग्नानंतर संपत्तीवर पत्नीचा हक्क  असतो असे  सत्यम सांगतो. हर्षवर्धन वकिलांना फोन करून काही कागदपत्रे तयार करण्यास सांगतो. या कागदपत्रांवर सावनीने सही केल्यानंतर तिचा हर्षवर्धनच्या संपत्तीवर कोणताही अधिकार राहणार नाही. त्याशिवाय, आमचं होणारे लग्नदेखील लग्न राहणार नाही असे सांगतो.


सागर-मुक्तामध्ये खुलतंय प्रेमाचे नाते


घरी सागरच्या मोबाईलवर मुक्ता सईसोबत आपला फोटो पाहते. याआधी फक्त सई असायची आता मीदेखील आहे असे पाहते. तेवढ्यात सागर येतो आणि  नवऱ्यावर संशय घेणाऱ्या बायकांप्रमाणे मोबाईल पाहत आहात का असा प्रश्न करते. त्यावर मी तुमचा मोबाईल स्क्रिन सेव्हर पाहत असल्याचे मुक्ता सांगते. ही माझी लाईफ लाईन असल्याचे सागर सांगतो. यावर मुक्ता लाजते पण तेवढ्यात तो मी सईबद्दल बोलतोय असे सांगतो. या संवादा दरम्यान सागर मुक्ताच्या सौंदर्याचे कौतुक करत आपले प्रेम व्यक्त करत असतो.