मुंबई : एसीपी प्रद्युम्न आता त्यांच्या खास शैलीत सहकाऱ्यांना ‘कुछ तो गडबड है’ म्हणू शकणार नाहीत, किंवा 'दया, दरवाजा तोड दो' यासारखा कोणताही आदेश देणार नाहीत. कारण, 21 व्या वर्षात प्रवेश करत असलेला आणि सर्वात जास्त चाललेला सीआयडी हा क्राईम शो बंद होणार आहे. या मालिकेचा अखेरचा भाग शनिवार म्हणजे 27 ऑक्टोबरला सोनी टीव्हीवर दाखवला जाईल.


सोनी टीव्हीवर 1998 साली सुरु झालेला हा शो देशातील घराघरात लोकप्रिय झाला आहे. पण आता प्रेक्षकांसाठी बॅड न्यूज आहे. मालिकेत दयाची भूमिका साकारणारे दयानंद शेट्टी यांनी स्वतः याबाबतची माहिती एबीपी न्यूजला दिली आहे.

दरम्यान, 20 वर्षात तब्बल 1550 एपिसोड पूर्ण करणाऱ्या ‘सीआयडी’विषयी सोनी टीव्हीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दयानंद शेट्टी यांनी 20 वर्षांपूर्वी या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. सलग 20 वर्षे दयाची भूमिका साकारणाऱ्या दयानंद शेट्टींनी माहिती दिली, की पाच दिवसांपूर्वी शोचे निर्माता बी. पी. सिंह यांनी अनिश्चित काळासाठी शुटिंग थांबवत असल्याचा फतवा काढला. सेटवर असलेले शिवाजी साटम, आदेश श्रीवास्तव आणि इतर सर्व कलाकारांना यामुळे धक्काच बसला. कुणालाही त्यावेळी विश्वास बसत नव्हता, असं दयानंद शेट्टींनी सांगितलं.

सोनी टीव्हीकडून या शोविषयी दाखवला जाणारा सावत्र व्यवहारही वाढला होता, असं दयानंद शेट्टी यांनी सांगितलं. एपिसोड ठरलेल्या वेळेपेक्षा नेहमीच 10-15 मिनिटे उशिरा ऑन एअर जायचा, ज्यामुळे चॅनलची भूमिका स्पष्ट दिसत होती, असं ते म्हणाले.

सीआयडी शोकडे सतत दुर्लक्ष करणं आणि इतर कारणांवरुन शोचे निर्माते बी. पी. सिंह आणि सोनी टीव्ही यांच्यातील तणावाचा परिणाम म्हणून हा शो आता बंद होत आहे. दरम्यान, शो बंद करण्यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

सुरुवातीपासून या शोमध्ये सहभागी असणारे आणि नंतर आलेल्या कलाकांरासाठी सीआयडीविषयी मनात खास जागा आहे. सर्व जण एका कुटुंबाप्रमाणे काम करत होते. यावेळी आम्हा सर्वांना अनाथ झाल्याची भावना आहे. आम्हा सर्वांना त्या चाहत्यांविषयी प्रचंड वाईट वाटतंय, जे 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही सीआयडीवर प्रेम करत होते, अशी प्रतिक्रिया दयानंद यांनी दिली.

मे 2016 मध्ये सीआयडी शो जवळपास एक महिन्यासाठी ऑफ एअर गेला होता. तर यावर्षीही जुलै ते सप्टेंबर या दोन महिन्यांसाठी हा शो सोनी टीव्हीवरुन गायब होता. सीआयडी हा शो विविध विक्रमांसाठीही ओळखला जातो. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही या शोची नोंद आहे.