मुंबई : मराठी बिग बॉसच्या पहिल्या सीझनची विजेती मेघा धाडे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मेघा पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत. होय, तुम्ही जे वाचलं ते अगदी खरं आहे. मेघाला कलर्स चॅनलवरील हिंदी बिग बॉसच्या बाराव्या मोसमात वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळाली आहे. आजच्या एपिसोडमध्ये मेघा बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे.


हिंदी बिग बॉसला महाराष्ट्रात विशेषत: मराठी प्रेक्षकांची म्हणावी तशी पसंती मिळालेली नाही. शिवाय मराठी प्रेक्षकांमध्ये बिग बॉसची चर्चाही नव्हती. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी बिग बॉसच्या निर्मात्यांनी 'मेघा धाडे कार्ड' खेळल्याची चर्चा आहे.


शिवाय बिग बॉसमध्ये नेहा पेंडसे हा एकमेव मराठी चेहरा होता. परंतु जे मराठी प्रेक्षक बिग बॉस पाहत होते, त्यांनीही नेहा घराबाहेर पडल्याने या शोकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन वळवून घेण्यासाठी मेघाला बिग बॉसच्या बाराव्या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली आहे.

मराठी बिग बॉसमुळे मेघा घराघरात पोहोचली. तिला नव्याने ओळख मिळाली. मेघाची हीच क्रेझ एन्कॅशन करण्यासाठी हिंदी बिग बॉसने तिलाच एन्ट्री दिली आहे. आता मराठी बिग बॉस गाजवणारी आणि शो जिंकणारी मेघा हिंदी बिग बॉसमध्ये काय धम्माल करणार हे आजपासून कळेल.