सांगली : 'लागिरं झालं जी' मालिकेतील कलाकारांचे फोटो कार्यक्रम पत्रिकेवर छापणं सांगलीतील आयोजकाला चांगलंच महागात पडलं आहे. परवानगीशिवाय फोटो छापल्याप्रकरणी मालिकेच्या कलाकाराने सातारा पोलिस ठाण्यात सांगलीच्या वाळवा भागातील आयोजकाविरोधात तक्रार दाखल केली. आयोजकांनी एका मध्यस्थीच्या करवी बोलणी झाल्यामुळे फोटो छापल्याचा दावा केल्याने या प्रकरणावर तूर्त पडदा पडला आहे.


सांगलीच्या वाळवा तालुक्यातील माळभागमधील 'राजमाता जिजाऊ अकॅडमी' यांच्याकडून शहीद जवानांच्या स्मरणार्थ पाच जानेवारी रोजी गावात 'सुरेल हिंदी गीतोंका संस्कार जागो हिंदुस्थानी' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे आयोजक श्रीकांत गणगटे यांची काही दिवसांपूर्वी सत्यप्पा मोरे नावाच्या व्यक्तीची ओळख झाली आणि मोरे यांनी गणगटे यांना 50 हजार रुपयात त्यांच्या कार्यक्रमासाठी 'झी मराठी' वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'लागिरं झालं जी'चे कलाकार धोंडिबा करांडे, किरण राणे, निखिल चव्हाण, संदीप जंगम यांना आणण्याची बोलणी झाली.

मध्यस्थाच्या आश्वासनामुळे गणगटे यांनी सर्व कलाकारांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार, अशी कार्यक्रम पत्रिका आणि प्रवेशिका फोटोसहित छापल्या. तीनशे रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत तिकीट शुल्क लावण्यात आलं आणि सोशल मीडियावर तिकिटाचे फोटो आणि पत्रिका वायरल केली.



दरम्यान, 'लागिरं झालं जी' मालिकेच्या कलाकारांना या कार्यक्रमाबाबत कोणतीही कल्पना नव्हती. ही बाब सोशल मीडियातून या मालिकेतील कलाकार आणि दिग्दर्शक धोंडीबा करांडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी इतर कलाकारांकडे याबाबत चौकशी करत याची माहिती घेतली. मात्र कोणत्याच कलाकाराला याची कल्पना नसल्याने करांडे यांनी सातारा पोलिस ठाण्यांमध्ये धाव घेत विनापरवानगी फोटो आणि नावे छापल्याबाबत तक्रार दाखल केली.

सातारा पोलिसांनी आयोजक श्रीकांत गणगटे यांना पाचारण करत याबाबत चौकशी केली असता, आपण मोरे यांच्याशी बोलणी करुन त्याआधारे पत्रिका छापून सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा दावा केला. त्यामुळे करांडे यांनी गणगटे यांच्याविरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेतली आहे.

दरम्यान सत्यप्पा मोरे यांची चौकशी करुन कायदेशीर कारवाईची मागणी करांडे यांनी केली आहे. तर आयोजक असणाऱ्या श्रीकांत गणगटे यांना आता कलाकारांविना हा कार्यक्रम होणार असल्याचं जाहीर केलं आहे.