मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वातील वादग्रस्त आणि बहुचर्चित स्पर्धक शेफ पराग कान्हेरे पुन्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्याची शक्यता आहे. खुद्द परागने फेसबुक पोस्ट लिहून त्याविषयी संकेत दिले आहेत. शिवानीपाठोपाठ परागही बिग बॉसच्या घरात पुनर्प्रवेश करत असल्याची चर्चा आहे.


'येतोय मी. आता सगळ्यांचा हिशोब होणार. तू, तो आणि ती पण जाणार' अशा आशयाची पोस्ट परागने फेसबुकवर केली आहे. त्यामुळे पराग बिग बॉसच्या घरात येण्याची शक्यता बळावली आहे. अर्थात तो 'वाईल्ड कार्ड' म्हणून प्रवेश करणार, की केवळ काही दिवसांसाठी, हे काही दिवसांनीच समजू शकेल.



बिग बॉसची स्पर्धक, अभिनेत्री नेहा शितोळेसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपानंतर पराग कान्हेरेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. 'बिग बॉस'च्या घरातील स्पर्धकांच्या एकमतानंतर 36 व्या दिवशी परागला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर येत्या आठवड्यात तो पुन्हा प्रवेश करेल.

गेल्याच शनिवारी शिवानी सुर्वेने बिग बॉसच्या घरात पुन्हा पाऊल ठेवलं. शिवानी केवळ पाहुणी म्हणून बिग बॉसच्या घरात गेलेली असली, तरी त्याची कल्पना स्पर्धकांना नाही.
 'आता सगळ्यांचा हिशोब होणार', पराग कान्हेरे पुन्हा 'बिग बॉस'च्या घरात?

शिवानीच्या एन्ट्रीनंतरही परागने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता. बिग बॉसच्या निर्णयाविरुद्ध परागने नाराजी व्यक्त केली होती. घरात शिव्या देऊन भांडणं केली असती, तर मलाही एन्ट्री मिळाली असती, असं पराग म्हणाला होता.



पराग कान्हेरे हा सुरुवातीपासूनच बिग बॉसमधील तगडा स्पर्धक मानला जात होता. वीणा, किशोरी, रुपाली आणि पराग यांचा 'केव्हीआरपी' ग्रुप प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. कालांतराने वीणासोबतच्या मतभेदानंतर परागने ग्रुपला सोडचिठ्ठी दिली. रुपाली आणि पराग यांच्या मैत्रीचीही सर्वत्र चर्चा होती.

परागच्या एक्झिटनंतर सोशल मीडियावर परागला मोठा पाठिंबा दर्शवण्यात आला होता. #BringBackParag या हॅशटॅगसह अनेकांनी सोशल मीडियावर समर्थन केलं होतं. आता अनेकांची मागणी ग्राह्य धरल्याचं चित्र आहे.

बिग बॉसच्या घरात असताना परागचं शिवानी, वैशाली, नेहा यांच्यासोबत कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यामुळे घरात पुन्हा एन्ट्री घेतल्यावर पराग नेमका कोणाचा हिशोब चुकता करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.