मुंबई : गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात चित्रीकरण बंद आहे. इकडे बंद होतं म्हणून सगळे निर्माते आधी गोव्यात आणि पुढे दमण, सिल्वासा इथे गेली. गेल्या महिन्याभरापासून तिथे चित्रीकरणं चालू आहेत. तिथे जर परमिशन मिळते तर त्याच नियमाने महाराष्ट्रातही चित्रीकरण करायला काय हरकत आहे? असा सवाल दिग्दर्शक, लेखक अभिजीत पानसे यांनी विचारला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी ट्वीटमधूनही सांस्कृतिक खात्याला चित्रीकरण सुरु करण्यासंदर्भत विनंती केली होती. 






सध्या मराठी, हिंदी मालिकांचं चित्रीकरण सिल्वासा, उंबरगाव, दमण इथे चालू आहे. बायोबबलचा वापर करुन या मालिकांचं चित्रीकरण करण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरापासून ही चित्रीकरणं चालू आहेत. गोव्याचा अपवाद वगळता तिथे कुणालाच काही अडचण आलेली नाही. यावरुन बोलताना अभिजीत पानसे म्हणाले, "मनसेमार्फत आम्ही सातत्याने मदत करत आहोत. काही दिवसांपूर्वी आम्ही रंगमंच कामगारांनाही अन्नधान्य वाटप केलं. त्यावेळी त्यांची स्थिती भयानक असल्याचं लक्षात आलं. मला वाटतं राज्य सरकारने लवकर काही पावलं उचलली नाहीत, तर शेतकऱ्यांपाठोपाठ मनोरंजन क्षेत्रातही आत्महत्या होऊ लागतील. त्यांची स्थिती बिकट आहे. अशावेळी राज्यात चित्रीकरणाचा पर्याय सुरु करता येईल. बायोबबल महाराष्ट्रात तर अगदीच होऊ शकतो. चित्रीकरण होऊ शकतील. राहता येईल, डिस्टन्स पाळता येईल अशी अनेक रेसॉर्ट राज्यात आहेत. तिथे त्यांना परवानगी दिली तर कामगारांचा प्रश्न मार्गी लागेल. शिवाय, सिल्वासा, दमण आदी भागापेक्षा आपल्याकडे नक्कीच जास्त सुविधा आहेत."


सध्या रंगमंच कामगारांचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला आहे. याबद्दल अभिजीत म्हणाले, "हाताला काम मिळालं की गोष्टी मार्गी लागतात. चित्रीकरण आपण बंद केलं आहे. पण बाकीची सगळी कामं लोक करत आहेतच. मुंबईच्या रस्त्यावर बघितलं तरी होणारी गर्दी लक्षात येते. अशावेळी बायोबबलचा पर्याय मुंबई आणि मुंबई बाहेर ठेवला तर त्या मंडळींना सोपं होईल. बॅकस्टेज आर्टिस्ट काम करु शकतील. शक्य असेल तर नाटकाच्या रंगमंच कामगारांनाही तिकडे सामावून घेता येतं का ते पाहता येईल. आज प्रत्येकजण घरी बसून एंटरटेन्मेंट पाहातो आहे. मग ते कोणतेही ओटीटी असोत. अशावेळी राज्य सरकारने याचा विचार करुन चित्रीकरणाला परवानगी द्यावी."


सर्वसाधारणपणे चित्रीकरण सुरु असलेल्या ठिकाणी सर्वत्र कोरोनाची काळजी घेतली जात आहे. जिथे घेतली जातेय, तिथे चित्रीकरणं नीट सुरु आहेत. अनेक लोक परराज्यात जाऊन सुखरुप आले सुद्धा. जर तिकडे बायोबबल क्रिएट होऊ शकतो तर तो इकडेही होऊच शकतो. शिवाय, यातून ज्या रिसॉर्टमध्ये चित्रीकरणं चालू आहेत, तिथे त्यांचं अर्थचक्र काही प्रमाणात सुरु होईल. यातून रोजगार महाराष्ट्रालाच मिळणार आहे," असंही पानसे म्हणाले.