Nitish Chavan : 'लागिरं झालं जी' (Lagir Zala Ji) मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता नितीश चव्हाण (Nitish Chavan) हा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाखात एक आमचा दादा या मालिकेतून नितीश कमबॅक करतोय. विशेष म्हणजे या मालिकेत नितीश हा चार बहि‍णींच्या भावाची भूमिका साकारत आहे. पुन्हा एकदा त्याच प्रोडक्शनसोबत आणि झी सोबत काम करताना अनुभव शेअर करताना नितीशने त्याच्या भावना सांगितल्या. 


नितीशला सख्खी बहिण नाही त्यामुळे ही भूमिका त्याला फार आवडली,अशी प्रतिक्रिया नितीशने यावेळी दिली. तसेच यावेळी पुन्हा एकदा झी मराठीच्या कुटुंबासोबत काम करतानाचा अनुभव कसा आहे, याविषयी देखील नितीशने भाष्य केलं आहे. 


नितीश काय म्हणाला ?


पात्राविषयी बोलताना नितीशने म्हटलं की, 'सूर्यादादाच्या या भूमिकेच्या तयारीबद्दल बोलायचं झालं तर , मला सख्खी बहिण नाही.  पण सूर्यादादा सारखंच माझ्या घरात उदाहरण आहे. जस सूर्याला चार बहिणी आहेत तसंच माझ्या मामाला ही चार बहिणी आहेत. त्यातली दोन नंबरची बहीण म्हणजे माझी आई त्यांचं नातं मी लहानपणापासून बघत आलो आहे. मामा कसा बहिणींची काळजी घेतो आणि त्याच्या बहिणी त्याच्यावर किती प्रेम करतात ह्या गोष्टी मी 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत सूर्याच्या भूमिकेसाठी आत्मसात केल्या आहेत. मालिकेत सूर्याच्या खांदयावर 4 बहिणींची जबाबदारी आहे, खऱ्या आयुष्यात मी कोणाचा दादा नाही पण मला एक दादा आहे त्याचे नाव आहे निलेश दादा.' 


 पुन्हा एकदा आपल्या माणसांमध्ये आल्यासारखं वाटतंय - नितीश चव्हाण


नितीशने म्हटलं की,  'लाखात एक आमचा दादा मालिकेसाठी मला वज्र प्रोडक्शन मधून खांबे सरांचा फोन आला होता त्यांनी मला सांगितले की एक भाऊ आणि त्याच्या चार बहिणींची गोष्ट आहे. गोष्ट थोडी  ऐकली आणि मला हा विषय नवीन वाटला मग मी खांबे सरांना परत कॉल केला आमचं अधिक बोलणं झालं  आणि मी ठरवलं की ह्या मालिकेचा भाग बनायचं. माझी पहिली मालिका देखील झी मराठी आणि वज्र प्रोडक्शन सोबत होती आणि आता पुन्हा एकदा आपल्या माणसांमध्ये आल्यासारखं वाटतंय. सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर फिरतायत. जेव्हा आपण आपल्या माणसांमध्ये येतो तेव्हा एका सुरक्षित वातावरणात आल्यासारखं वाटतं आणि काम करण्याची ऊर्जा अधिक वाढते.'


ही बातमी वाचा : 


Hina Khan : 'आता घाबरुन चालणार नाही...',कर्करोगाशी झुंजत असतानाच हिना खानची पोस्ट चर्चेत