साखरपुड्याचं वृत्त पूर्णपणे चुकीचं : सुयश टिळक
एबीपी माझा वेब टीम | 04 Jan 2018 11:02 PM (IST)
हे वृत्त पूर्णपणे चुकीचं असल्याचं स्पष्टीकरण सुयश टिळकने एबीपी माझाशी बोलताना दिलं आहे.
मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या पाठकबाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर आणि 'का रे दुरावा'फेम जय अर्थात अभिनेता सुयश टिळक यांनी गुपचूप साखरपुडा केल्याच्या बातम्यांना ऊत आला आहे. मात्र हे वृत्त पूर्णपणे चुकीचं असल्याचं स्पष्टीकरण सुयश टिळकने एबीपी माझाशी बोलताना दिलं आहे. ''साखरपुड्याची बातमी कशी पसरली माहित नाही, पण सर्व वृत्तपत्र आणि चॅनेल्समध्ये ही बातमी दिसत आहे. काहीही कारण नसताना लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यावं लागतंय'', असं म्हणत सुयश टिळकने संतापही व्यक्त केला आहे. सुयश आणि अक्षया साधारण गेल्या वर्षभरापासून रिलेशनशीपमध्ये असल्याचं म्हटलं जातं. दोघांनीही अद्याप आपल्या नात्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही, मात्र इन्स्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्स दोघांचे फोटो पाहायला मिळतात. त्यातच सुयशने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे त्यांचा साखरपुडा झाल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती. मात्र हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.