मुंबई : विनोदी अभिनेत्री भारती सिंगने मनोरंजन विश्वात मोठं यश कमावलं आहे. भारतीने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक घटना सांगितल्यामुळे अनेकांचं हृदय हेलावलं आहे. आपण पोटात असतानाच आई गर्भपात करणार होती, असं भारतीने सांगितलं.
अभिनेता राजीव खंडेलवालच्या 'जझबात' या चॅट शोमध्ये भारतीने ही आठवण सांगितली. कुटुंबाच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे आईने गर्भपाताचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर तिने तो बदलला आणि मला जन्म दिला, असं भारतीने सांगताच उपस्थित प्रेक्षकांचे डोळे पाणावले.
'त्यावेळी तिने गर्भपाताचा निर्णय कसा घेतला असेल, याची मला कल्पनाही करवत नाही. आज मात्र तिला माझा प्रचंड अभिमान आहे' असं भारती कौतुकाने सांगते.
'माझ्या एका परफॉर्मन्सच्या आधी आईला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. माझ्यात शो करण्याचा फारसा उत्साह नव्हता. पण आईनेच मला प्रोत्साहन देऊन कार्यक्रम करण्यास सांगितलं' अशी आठवणही भारतीने या शोमध्ये सांगितली.
'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या रिअॅलिटी शोमधून भारतीने 2008 साली टेलिविश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर कॉमेडी सर्कसचे अनेक सिझन्स तिने दमदार परफॉर्मन्सने गाजवले.
इतकंच काय, भारती झलक दिखला जा, नच बलिये यासारखे डान्स रिअॅलिटी शो, बिग बॉस, फिअर फॅक्टरमध्येही झळकली. 3 डिसेंबर 2017 रोजी भारती हर्ष लिंबाचियासोबत गोव्यात विवाहबंधनात अडकली.
अभिनेता राजीव खंडेलवालने झी टीव्हीवरील 'जझबात' या शोमधून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. यापूर्वी तो 'सच का सामना' हा शो करत होता.