प्रत्युषाचा एक्स बॉयफ्रेण्ड असलेला राहुल राज सिंगवर प्रत्युषाच्या मृत्यू प्रकरणात मुख्य आरोपी होता. त्याच्यावर प्रत्युषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हाही नोंदवण्यात आला होता. नुकतंच राहुलने ही केस रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता.
राहुलने वाढदिवसाच्या निमित्ताने नव्या आयुष्याला सुरुवात करत असल्याची घोषणा केली. सलोनी शर्मा आपली होणारी बायको असल्याचं त्याने इन्स्टाग्रामवर जाहीर केलं.
'हे वर्ष खूप मोठं वाटलं.. अनेक चढउतार आले. ज्या गोष्टी तुम्हाला जीवघेण्या वाटतात, त्याच तु्म्हाला कणखर करतात.' असं सांगत राहुलने आपल्या हितचिंतकांचे आभार मानले.
1 एप्रिल 2016 रोजी प्रत्युषाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत तिच्या मुंबईतील राहत्या घरी आढळला होता. त्यावेळी ती अवघी 25 वर्षांची होती. जमशेदपूरमध्ये जन्म झालेल्या प्रत्युषाने अभिनयासाठी वयाच्या 19 व्या वर्षी मुंबई गाठलं.
2010 मध्ये प्रत्युषाने 'बालिका वधू' मालिकेत मोठ्या आनंदीची भूमिका साकारत टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती झलक दिखला जा, बिग बॉस सारख्या रिअॅलिटी शोमध्येही झळकली होती.