मुंबई : यंदाच्या आयएनटी एकांकिका स्पर्धेवर दादरच्या कीर्ती महाविद्यालयाने आपली मोहर उमटवली. कीर्ती महाविद्यालयाची 'ईव्हॉल्यूशन ए क्वेश्चनमार्क' ही एकांकिका यंदा अव्वल ठरली. आयएनटी ही एकांकिका विश्वातील अतिशय मानाची स्पर्धा आहे.


तर व्हीजेटीआय महाविद्यालयाच्या 'पॉज' या एकांकिकेने दुसरा आणि सिडन्हॅम महाविद्यालयाच्या 'निर्वासित' एकांकिकेने तिसरा क्रमांक पटकावला.

मुंबईच्या यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिरात आयएनटीच्या अंतिम फेरीचा सोहळा रंगला. मुंबईतून यंदा दहा महाविद्यालयांच्या एकांकिका अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या होत्या.

किर्ती महाविद्यालयाच्या सिद्धांत बेलवलकरने यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला तर सिडन्हॅम महाविद्यालयाची सायली बांदकर सर्वोकृष्ट अभिनेत्री ठरली. 'ईव्होल्यूशन ए क्वेश्चनमार्क' एकांकिकेचं दिग्दर्शन करणारा किर्ती कॉलेजचा साबा राऊळ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरला.

व्हीजेटीआयच्या 'पॉज' या एकांकिकेसाठी प्रशांत जोशीला सर्वोत्कृष्ट लेखकाचं पारितोषिक मिळालं.  यंदा आयएनटीत आपल्या विनोदी अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या डहाणूकर कॉलेजच्या मनमीत पेमला सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आलं.