अकलूज (सोलापूर) : ‘एबीपी माझा’च्या ‘रंग माझा वेगळा’ ह्या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. नऊ नायिकांमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत अनेकींच्या ‘बार्गेनिंग’ कौशल्याचा कस लागला. शॉपिंग क्वीन बनण्यासाठी नऊही नायिकांनी फार मेहनत घेतली. पण यात बाजी मारली ती रिंकू राजगुरु. होय, ‘सैराट’च्या आर्चीने अकलूजमध्ये केवळ 110 रुपयांत साडी, चप्पल, कानातले आणि गंध घेत तब्बल 1390 रुपयांत बचत केली.


शॉपिंग क्वीन ठरल्यानंतर पुन्हा तिच्या गावाला, अकलूजला जाण्याचा योग आला. घरी गेल्यानंतर रिंकूला पाहिल्यावर जाणवलेली पहिली गोष्ट म्हणजे तिचं घटलेलं वजन. रिंकू फारच बारीक झाली आहेस असं विचारल्यावर तिने ‘हो’ एवढंच उत्तरं दिलं. किती वजन कमी केलं, याचा खुलासा तिला बहुदा करायचा नव्हता. पण ‘सैराट’मधली रिंकू आणि आताची रिंकू यात छान बदल दिसतोय हे नक्की.

रिंकू सध्या काय करते?

तर ‘सैराट’ रिलीज होऊन आता दीड वर्ष झाली. ‘सैराट’ सुपरडुपर हिट झाला. ज्यांनी आयुष्यात कधी अॅक्टिंग केली नव्हती त्यांना घेऊन नागराज मंजुळेने चित्रपट बनवला. त्या मुलांना मिळालेली लोकप्रियता हे सांगायची गरज नाही. पण ‘सैराट’नंतर आकाश ठोसरने ‘एफयू’ नावाचा सिनेमा केला. पण रिंकूने काय केलं? ती आता काय करतेय हे प्रश्न पडले असतीलच.


...म्हणून कॉलेजमध्ये अॅडमिशन नाही

‘सैराट’नंतर तिने तिचं दहावीचं शिक्षण पूर्ण केलं. तिने अकरावीला कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं असेल असा विचार करत असाल तर तो चुकीचा आहे. सिनेमात आर्ची कॉलेजात जात असली तर खऱ्याखुऱ्या आयुष्यात रिंकूला कॉलेजात जाता येत नाही. ह्याचं कारण म्हणजे तिला मिळालेल्या लोकप्रियतेत थोडीही घट झालेली नाही. तिची क्रेझ अजूनही कायम आहे. त्यामुळे ह्या क्रेझी फॅन्सपासून वाचण्यासाठी रिंकू आता बारावीची परीक्षाही दहावीप्रमाणे बाहेरुन देणार असल्याचं तिच्या वडिलांनीच सांगितलं.

दाक्षिणात्य भाषा अवघड, पण शिकल्याचं समाधान

‘सैराट’च्या कन्नड भाषेतील रिमेकमध्येही रिंकूनेच काम केलं आहे. ‘सैराट’ एप्रिलमध्ये प्रदर्शित झाला आणि सप्टेंबर महिन्यात कन्नड रिमेकच्या शूटिंगला सुरुवात झाली. कन्नड भाषा शिकायला जरा अवघडच असल्याचं ती म्हणते. पण तेलुगू आणि कन्नड या दाक्षिणात्य भाषा शिकायला मिळाल्याचं समाधानही तिला आहे.



...तरीही लोक पाठलाग करतातच

प्रसिद्धी जेवढी हवीहवीशी वाटते तेवढीच नकोशी पण. रिंकूच्या बाबतीत तर हे तंतोतंत लागू होतं. कारण आता ती काही दिवस अकलूजमध्ये असते तर काही दिवस पुण्यात. अकलूजमध्ये आल्यावर तिला संपूर्ण दिवस नाईलाजाने घरातच घालवावा लागतो. शॉपिंगला, फिरायला जावं असा विचार मनात आला तरी तो मनातच ठेवावा लागतो. कारण घराबाहेर पडताच येत नाही. जर घरातून बाहेर पडायचं झालं तरी तोंडाला स्कार्फ बांधूनच निघावं लागतं. इतकं करुनही काही फरक पडत नाही, कारण लोकांना आमच्या घरातल्या गाड्यांचा नंबर माहित आहे, त्यावरुन ते पाठलाग करत येतातच, असं रिंकूने सांगितलं.

कॉलनीतल्या लोकांचा सपोर्ट

रिंकू अकलूजला आलीय ही बातमी पण ह्या कानाची त्या कानाला ऐकू जाऊ नये याची काळजी घरचे घेतात. ती आल्याचा कोणालाही थांगपत्ता लागू देत नाहीत. कॉलनीतले लोक पण तेवढा सपोर्ट करतात, असं रिंकूची आई सांगते.



सिनेमाचं वाचन सुरुय

सध्या कोणती मालिका किंवा सिनेमा करतेयस का? असं विचारल्यावर तिने तातडीने उत्तरं दिलं की, मालिका नाही पण सिनेमाचं वाचन सुरुय. त्यामुळे येत्या काळात रिंकू तुम्हाला मोठ्या पडद्यावर दिसेल. ती भूमिका, व्यक्तिरेखा काय असेल हे तेव्हाच स्पष्ट होईल.

नागराज मंजुळेंना अॅक्टिंग करताना पाहून मस्त वाटलं!

नागराज मंजुळे ‘द सायलेन्स’ या चित्रपटातून अभिनय करताना दिसणार आहे. अनेक फेस्टिव्हलमध्ये गाजलेला हा चित्रपट पाहिलास का असं विचारला असता, सिनेमा फारच चांगला असल्याचं ती म्हणाली. त्यांना अॅक्टिंग करताना पाहणं मस्त वाटलं, असंही ती म्हणाली. नागराजची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 6 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.