मुंबई : प्रसिद्ध मराठी सिने-नाट्य कलाकार दिनेश साळवी याचं आकस्मिक निधन झालं. ते 53 वर्षांचे होते. काल (30 जानेवारी) मुंबईतील विले पार्ले स्टेशनला जाताना छातीत दुखू लागल्याने ते खाली बसले आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी रात्री उशिरा त्यांना मृत घोषित केलं, त्यामुळे आज त्यांच्या निधनाची बातमी पसरली आहे.

सीआयडीसह अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेल्या दिनेश साळवी यांच्या आकस्मिक निधनाने सिने आणि नाट्यसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ते अभिनेता आदेश बांदेकर यांचे अतिशय जवळचे मित्र होते.

लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक अशी दिनेश साळवी यांची ओळख होती. ते मेन स्ट्रीममधील अभिनेते नव्हते. परंतु अनेक मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. कामगार कल्याणच्या नाटकांमध्ये त्यांची कारकीर्द घडली. कॉलेजमधील बऱ्याच एकांकिका त्यांनी बसवल्या होत्या.