मुंबई : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणावर आता वेबसीरिज येणार आहे. मूळ भारतीय असलेल्या कॅनडाच्या रिची मेहताने 'दिल्ली क्राइम' या नावाने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. आगामी 22 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.

2012 मध्ये दिल्लीत 'निर्भया' वर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणी केलेल्या तपासावर ही सीरिज आधारित आहे. यामध्ये शेफाली शाह, आदिल हुसैन, डेंझिल स्मिथ, रसिका दुग्गल, राजेश तैलंग आणि यशस्विनी दायमा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.


6 डिसेंबर 2012 साली दिल्लीतील चालत्या बसमध्ये झालेल्या या सामूहिक बलात्कार प्रकरणाने मानवतेला काळीमा फासला होता. या घटनेनं संपूर्ण देश पेटून उठला होता. या सत्य घटनेवर आधारित 'दिल्ली क्राइम' ही वेबसीरिज सात भागांची असणार आहे.

गेल्याच वर्षी  निर्भया बलात्कार प्रकरणावर आधारित 'दिल्ली बस' हा चित्रपट देखील आला होता.  या घटनेवर आधारित लेस्ली उडविन यांचा 'इंडियाज डॉटर' हा माहितीपटही आला होता. यामुळे मोठा वाद भारतात निर्माण झाला होता. या माहितीपटाच्या प्रदर्शनावर भारतात बंदीही घालण्यात आली होती.

निर्भया बलात्कार प्रकरणानंतरच्या संपूर्ण तपासावर 'दिल्ली क्राइम' ही सीरिज आधारित आहे. रिची मेहताच्या या वेबसिरिजमध्ये अभिनेत्री शेफाली शहा महिला पोलिस अधिकारी वर्तिक चतुर्वेदीच्या भूमिकेत  आहे.  रिची मेहताने याआधी 'अमाल', 'आय विल फॉलो यु डाऊन', 'सिद्धार्थ' अशा चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.