भोपाळ : सरकारी नोकरीत बदली म्हटलं की अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यात पती पत्नी दोघेही सरकारी नोकरीत असतील तर अनेकांना आपल्या सोईनुसार बदली मिळत नाही. नोकरीच्या ठिकाणी अनेक अडचणींचा सामना करुन राहावं लागतं, वेळप्रसंगी वेगळं राहावं लागतं. अशीच स्थिती मध्य प्रदेशमध्ये दाम्पत्याची होती. मात्र अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या एका आवाहनामुळे या दाम्पत्याला एकाच शहरात काम करण्याची संधी मिळाली आहे.


विवेक परमार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केबीसी शोमध्ये आले होते. विवेक परमार हे मध्य प्रदेशच्या मंदसौरमधील वाहतूक विभागात कार्यरत आहेत. या शो दरम्यान अमिताभ बच्चन यांनी विवेक यांना त्यांच्या कुटुंबाची माहिती विचारली. त्यावेळी विवेक यांनी तीन वर्षांपासून पत्नी ग्वालियरमध्ये काम करत असल्याने सांगितलं होतं. या जोडप्याची ही स्थिती पाहून अमिताभ बच्चन यांनी दोन शहरात काम करणाऱ्या अशा जोडप्यांना एकाच शहरात काम करण्याची संधी दिली पाहिजे, असं म्हटलं होतं. तसेच या मध्य प्रदेश पोलिसांनी परमार दाम्पत्याबद्दल विचार करावा असं आवाहनही केलं होतं.



अमिताभ बच्चन यांच्या आवाहनासा मध्य प्रदेश पोलिसांनी प्रतिसाद दिला. मंदसौरच्या खासदारांनीही या दोघांची एका शहरात नियुक्ती करावी यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यानंतर पोलीस विभागाने मंगळवारी विवेक परमार यांच्या पत्नी प्रीती यांची मंदसौर येथील नार्कोटिक्‍स विभागात बदली केली असल्याचं जाहीर केले.