मुंबई : 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमलेनाच्या उपाध्यक्षपदी भाजप खासदार किरीट सोमय्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र मराठीचा गंधही नसलेल्यांचा मराठी नाट्य संमेलनाशी काय संबंध? असा सवाल मनसेचे नेते शिशिर शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

शालेय शिक्षणात मराठी विषय सक्तीचा करण्याला सर्वप्रथम खासदार किरीट सोमय्या यांनीच विरोध केला होता. शिवाय या निर्णयाविरोधात कोर्टातही धाव घेतली होती. अशावेळी किरीट सोमय्यांना उपाध्यक्ष का करावं, असा प्रश्न शिशिर शिंदे यांनी विचारला आहे.

14 जूनपासून मुंबईतल्या मुलुंडमध्ये 98 वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन भरणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. भाजपचे मराठीद्वेष्टे खासदार किरीट सोमय्या यांना नाट्य संमेलनाचं उपाध्यक्षपद दिल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे.

शिशिर शिंदे यांच्या पत्रात काय?

98 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मुलुंड येथे 14 जून पासून भरणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री श्री. विनोद तावडे या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. हे ठीक आहे. पण भाजपाचे मराठी द्वेष्टे खासदार किरीट सोमैया हे नाट्य संमेलनाचे उपाध्यक्ष आहेत. महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणात मराठी हा विषय सक्तीचा केला तेव्हा मराठी विरोधात न्यायालयात धाव घेणारे किरीट सोमैया हेच आहेत.

मुलुंडच्या संभाजीराजे मैदानात सकाळी 6 ते 9 या वेळेत जाॅगर्सना परंपरागत ज्यूस पुरवणाऱ्या मराठी विक्रेत्याला मैदानाच्या सीमेवरुन रस्त्यावर हाकलणारे हेच सोमैया महाशय मुलुंड रेल्वे स्थानकालगतच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर आक्रमण करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांबाबत मूग गिळून गप्प बसलेत.

1985 पासून नगरसेवक आणि विधानसभेत हॅट्रिक करणारे मुलुंडचे ‘पेव्हरसम्राट’ आमदार सरदार तारासिंह नाट्यसंमेलनाचे सचिव आहेत. सरदार तारासिंह कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात फक्त हिंदीतच बोलतात. तारासिंह यांनी तिकीट काढून एकतरी मराठी नाटक आजपर्यंत पाहिले आहे काय? सोमैया व तारासिंह एखाद्या मराठी रंगकर्मीच्या मदतीला कधी धावून गेल्याचे एकही उदाहरण सापडत नाही.

सुप्रसिध्द अभिनेते श्री. विजय चव्हाण यांना महाराष्ट्र शासनाचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार मिळाला. ‘मुलुंडकर’ विजय चव्हाणांच्या घरी जावून त्यांचे अभिनंदन करण्याचे सौजन्यसुध्दा सोमैया व तारासिंह या जोडगोळीने दाखवले नाही.सर्वात कहर म्हणजे स्थानिक नगरसेविका श्रीमती समिता कांबळे यांचे नाव कुठेच नाही (सुज्ञास अधिक सांगणे न लगे).

मराठी नाट्यसंमेलनाच्या आवाहन पत्रिकेत अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांचे नाव या निरर्थक राजकारण्यांनंतर सहाव्या स्थानावर आहे.

मुलुंड ते विक्रोळी पर्यंतचा परिसर आमच्या आवाक्यात आहे असा दावा संबंधित करतात. या मिरवणाऱ्या सर्व संबंधितांना विजय चव्हाण, पुरुषोत्तम बेर्डे, कमल शेडगे, संजय नार्वेकर, कुमार सोहोनी, केदार शिंदे, संजीवनी जाधव, सुचित्रा बांदेकर, विजया वाड या रंगकर्मींचा विसर पडू नये म्हणजे झाले.

थोडक्यात साहित्य संमेलन असो किंव्हा नाट्यसंमेलन असो येथे पंचपक्वान्नांच्या किती पंगती उठल्या याचाच हिशोब सवंग लोकप्रियतेसाठी केला जातो. उत्सवी संमेलनांमधून चांगले साहित्य, विचार मंथन किंवा मराठी नाट्यसृष्टीपुढील आव्हाने असे विषय केव्हाच हद्दपार झाले, हीच मराठीची शोकांतिका आहे.