Me Honar Superstar - Chhote Ustaad : प्रत्येक प्रतिभावान कलाकाराला त्याच्या कलेसाठी हवं असतं एक हक्काचं व्यासपीठ. ज्याद्वारे तो त्याची कला लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. गायनाचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील स्पर्धकांसाठी असाच एक मंच उभारला तो स्टार प्रवाह वाहिनीने. स्पर्धकांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सुरू झाला एक प्रवास तो म्हणजे मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या गायकांनी स्वतःला सिद्ध केलं आणि त्यातील सहा सर्वोत्तम स्पर्धकांनी आता गाठली आहे महाअंतिम फेरी. 


अप्रतिम गाणी सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या आठ मे रोजी पाहायला मिळणार आहे. राजयोग धुरी, शुद्धी कदम, सार्थक शिंदे, सिद्धांत मोदी, राधिका पवार आणि सायली टाक या सहा जणांमध्ये महाअंतिम लढत रंगेल. त्यामुळे सुपरस्टार होण्याचा मान कोण पटकवणार याची उत्सुकता वाढली आहे.




स्पर्धकांच्या धमाकेदार परफॉर्मन्सेससोबतच आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांच्यातली जुगलबंदी महाअंतिम सोहळ्याची रंगत आणखी वाढवणार आहे. विशेष म्हणजे महाअंतिम सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश-विश्वजीत, निलेश मोहरीर, रोहन रोहन, पंकज पडघन, कौशल इनामदार उपस्थित रहाणार आहेत. यासोबतच स्टार प्रवाहच्या परिवाराच्या उपस्थितीत सोहळ्याची रंगत द्विगुणीत होणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचा महाअंतिम सोहळा आठ मे रोजी सायंकाळी सात वाजता फक्त स्टार प्रवाहवर.


संबंधित बातम्या