Me Honar Superstar - Chhote Ustaad: स्टार प्रवाहवर सुरु होतंय गाण्याचं दुसरं पर्व अर्थातच ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ (Me Honar Superstar - Chhote Ustaad). पहिल्या पर्वाला मिळाल्या उदंड प्रतिसादानंतर आता नवे छोटे उस्ताद सुरांची मैफल घेऊन सज्ज झालेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले 4 ते 14 या वयोगटातील छोटे उस्ताद आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहेत. पहिल्या पर्वाप्रमाणे या पर्वातही जजच्या भूमिकेत दिसतील सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे. या कार्यक्रमाचं वेगळेपण म्हणजे पहिल्या पर्वातील लोकप्रिय स्पर्धक म्हणजेच शुद्धी, सायली, सार्थक, सिद्धांत आणि स्वरा या पर्वात छोट्या उस्तादांना आपल्या सुरांची साथ देणार आहेत. सुरांचा दरबार हे यंदाच्या पर्वाची खास थीम असल्यामुळे कार्यक्रमातील भव्यता प्रेक्षकांना प्रोमोपासूनच अनुभवायला मिळणार आहे.   ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, छत्रपती संभाजी नगर येथील 13 वर्षाची रागिणी शिंदे ही गाणं गाताना दिसत आहे.


‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’  या कार्यक्रमाविषयी सांगताना सचिन पिळगावकर म्हणाले, ‘छोटे उस्तादचं पर्व पुन्हा एकदा भेटीला घेऊन येतोय. पुन्हा एकदा माझे साथी अर्थातच वैशाली आणि आदर्श एकत्र येऊन छोट्या बालगोपालांना नव्या पद्धतीने लोकांसमोर आणणार आहोत. एक दिशा देण्याचा प्रयत्न ज्या वयात हवा असतो त्या वयात या मुलांना योग्य दिशा मिळणार आहे याचा आनंद आहे.’






तर वैशाली सामंत म्हणाल्या, ‘छोट्या दोस्तांसोबतचा हा सुरांचा प्रवास अनुभवण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. गेल्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. लहान वयात जे शिकवलं जातं ते मनात कायमचं कोरलं जातं. आपल्या ज्ञानाचा नव्या पीढीला फायदा होतोय याचा आनंद आहे. या पर्वाचं वेगळेपण म्हणजे संगीताचा दरबार. आपल्या प्रत्येकालाच राजा-राणीच्या गोष्टींमध्ये हरवून जायला आवडतं. गोष्टीतला हा दरबार या पर्वाच्या निमित्ताने सत्यात उतरणार आहे. या मंचावर येणारा प्रत्येक स्पर्धक खूपच स्पेशल आहे आणि त्यामुळेच दरबारात गायल्याचा आनंद छोटे उस्तादचा मंच देणार आहे.’  


आदर्श शिंदे देखिल या कार्यक्रमासाठी खुपच उत्सुक आहे. छोटे उस्तादच्या दुसऱ्या पर्वाविषयी सांगताना आदर्श म्हणाला ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या पहिल्या पर्वाला खूप प्रेम मिळालं. या कार्यक्रमातील स्पर्धक खऱ्या अर्थाने सुपरस्टार झाले. हे स्पर्धक माझ्या कार्यक्रमांमध्ये देखिल परफॉर्म करतात. या मुलांचं यश मी जवळून अनुभवत आहे. दुसऱ्या पर्वाविषयी मला सतत विचारणा होत होती. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे. तेव्हा बच्चेकंपनीच्या सुरांची ही अनोखी मैफल अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व दुसरे 10 जूनपासून शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’


संबंधित बातम्या


Me Honar Superstar Chhote Ustaad 2: सुरांची जुगलबंदी होणार, छोटे उस्ताद जादू करणार; 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' चा नवा प्रोमो पाहिलात?