Mazhi Tuzhi Reshimgath : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) या मालिकेचा आज शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने चाहते नाराज झाले आहेत. दरम्यान प्रार्थना बेहेरेने (Prarthana Behere) एक खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. 


प्रार्थनाने लिहिलं आहे,"सर्वांचे आभार... मालिका संपत आहे.. पण आपलं नातं नाही...आपली ही रेशीमगाठ कायम राहणार आहे...वर्षानुवर्षे... कारण आम्ही लवकरच काहीतरी नवीन घेवून येऊ... फक्त तुमच्यासाठी... आणि म्हणूनच कोणीतरी म्हटलंय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त". 






'माझी तुझी रेशीमगाठ'चा रंगणार एक तासाचा विशेष भाग!


'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेचा आज एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे. हा विशेष भागच या मालिकेचा शेवटचा भाग असणार आहे. त्यामुळे आता नेहाची स्मृती परत येईल का? नेहाला परीसोबतचं तिचं नातं आठवेल का आणि परीला भेटायला ती जाणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना या विशेष भागात मिळणार आहेत. 


'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका अव्वल ठरली होती. पण अचानक काही कारणाने निर्मात्यांनी ही मालिक बंद करण्याचा निर्णय घेतला. याचाच परिणाम मालिकेच्या टीआरपीवर झाला आणि टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका मागे पडली. त्यामुळे निर्मात्यांनी पुन्हा एकदा ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. 


'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत होते. तसेच मालिकेतील छोट्या परीने अर्थात मायरा वैकुळने अल्पावधीतचं प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. मायराने या मालिकेच्या मध्यमातून वयाच्या चौथ्या वर्षी मालिकाविश्वात पदार्पण केलं आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. 


'36 गुणी जोडी' येणार प्रेक्षकांच्या भेटीला!


'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने या मालिकेची जागा '36 गुणी जोडी' या नव्या मालिकेने घेतली आहे. ही मालिका प्रेक्षकांना 23 जानेवारीपासून सोम ते शनि संध्याकाळी 6.30 वाजता पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. 


संबंधित बातम्या


Happy Birthday Myra Vaikul: वयाच्या चौथ्या वर्षी मालिकाविश्वात पदार्पण, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असणारी 'परी' मालिकेतील एका भागासाठी किती मानधन घेते?