Marathi Serial Updates  Tula Shikvin Changlach Dhada :  छोट्या पडद्यावरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ( Tula Shikvin Changlach Dhada) या मालिकेचे सध्या थायलंडमध्ये चित्रीकरण सुरू आहे. अक्षरा आणि अधिपती यांच्या प्रेमाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. झी मराठीवरील या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. थायलंडमधील एका बेटावर 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेचे चित्रीकरण करण्यात आले. मात्र, या दरम्यान मालिकेची टीम या बेटावर अडकली होती. मालिकेतील अधिपती अर्थात अभिनेता हृषिकेश शेलार याने आपला हा अनुभव शेअर केला आहे. 


'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेचे चित्रीकरण सध्या थायलंडमध्ये सुरू आहे. आकर्षक समुद्रकिनारे, मंत्रमुग्ध करणारा निसर्ग आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांवर अक्षरा-अधिपती ताव मारताना दिसणार आहे. थायलंडच्या समुद्र किनाऱ्यावर अधिपती-अक्षरा हे  'कहो ना प्यार हैं' गाण्यावर थिरकले आहेत. या गाण्याच्या प्रोमोचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अधिपती म्हणजे अभिनेता हृषिकेश शेलारने आपला अनुभव सांगताना म्हटले की, " माझी मनापासून इच्छा होती की परदेशात जाऊन शूटिंग करावं ती इच्छा माझी इथे पूर्ण झाली. मुंबईमध्ये आमची  किमान 50-60 जणांची टीम असते. पण थायलंडला आम्ही  15-16 जणच होतो. तिथे शूटिंगच सगळं सांभाळायला आणि ती एक वेगळीच तारे वरची कसरत होती. नवीन देश आणि तिथे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंगची परवानगी काढणे, तिकडच्या भाषेमध्ये संवाद साधून काम करणे अवघड काम होत पण त्यात खूप मज्जा आली असल्याचे हृषिकेशने सांगितले.


'त्या' बेटावरच अडकलो होतो...


हृषिकेशने पुढे सांगितले की, तुम्ही अधिपती-अक्षरावर चित्रित झालेलं जे गाणं पाहत आहात  ते आम्ही एका आयलंडवर शूट केलं.  आमच्याकडे खूप कमी वेळ होता आणि त्यात आम्हाला गाणंही शूट करायच होतं आणि सीन सुद्धा करायचा होता. ह्याच आयलंडवर 'कहो ना प्यार हैं' च्या  ओरिजिनल गाण्याचं चित्रीकरण झालं आहे. त्याच ठिकाणी आम्ही ही ते गाणं पुन्हा रीक्रिएट केलं खूप भन्नाट अनुभव होता. पण ते चित्रीकरण करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले कारण आमच्या हातात एकचं दिवस होता. त्यात ही जोरदार पाऊस आला मध्यंतरी आम्ही बोटचा प्रवास करून त्या आयलंडवर पोहचलो. शूटसाठी सुरुवात केली आणि पाऊस कोसळायला लागला आम्हाला शूट थांबवावं लागलं असल्याचे हृषिकेशने सांगितले. 


आम्हाला येथून परत  जाता येईल का असा मनात प्रश्न निर्माण झाला होता. त्या बेटावर खूप पाऊस कोसळत होता. अखेर जवळपास 2 तासांनी पाऊस थांबला आणि आम्ही गाण्याच्या शूटिंगला सुरुवात केली असल्याचे अभिनेता हृषिकेशने सांगितले.