Marathi Serial Updates Tu Bhetashi Navyane : नव्वदीचे दशक फॅशन,सौंदर्य, टेलिव्हिजनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण संक्रमणाचा कालखंड होता. याच कालावधीत अनेक क्षेत्रांत आमूलाग्र बदल होत होते. आजही त्या आठवणी अनेकांसाठी ताज्या आहेत. हा काळ जगलेली पिढी त्या दिवसांची आठवण नक्कीच काढते. आता हाच काळ आता छोट्या पडद्यावर अनुभवण्यास मिळणार आहे. नव्वदीच्या दशकातील हा काळ आता सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
नव्वदीचे दशक फॅशन आणि सौंदर्य ट्रेंडचा एक महत्त्वपूर्ण कालखंड ठरला. या काळातील बरेच ट्रेंड सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय झाले होते. बॉलिवूड सेलिब्रिटींनी सेट केलेल्या ट्रेंडला या काळात चांगली लोकप्रियता मिळाली होती. या काळातील फॅशन आजही काही खासनिमित्ताने फॉलो केली जाते. आता, सोनी मराठी वाहिनीने या ट्रेंड चा अभ्यास करत त्याकाळातील फॅशन ट्रेंड ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेतून पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला आहे.
सुबोध-शिवानीचा लूक चर्चेत
अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जाणारा सुबोध भावे छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत सुबोध भावे दुहेरी भूमिका साकारत आहे. या मालिकेतील लूकमुळे सुबोध भावे चर्चेत आहे. ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत एका नव्या रूपात आपल्याला सुबोध भावे आणि शिवानी सोनार ही जोडी दिसणार आहे. सुबोध आणि शिवानी यांच्या खास लूकची पहिली झलक समोर आली आहे. या दोघांचा लूक त्यांच्या चाहत्यांना भावला आहे. नव्वदीच्या दशकातील त्यांचा हा हटके लूक चर्चेचा विषय ठरलाय. ‘तू भेटशी नव्याने' मालिकेच्या निमित्ताने प्रथमच दोन वेगळ्या काळातल्या भूमिका आणि नव्वदीच्या काळातील नॉस्टेल्जीया अनुभवायला मजा येणार असल्याचे अभिनेता सुबोध भावे आणि शिवानी सोनारने सांगितले आहे.
मालिकेत पहिल्यांदाच AI चा वापर
या मालिकेत पहिल्यांदाच AI चा वापर केला आहे. AI चा वापर करून ह्या मालिकेतील व्यक्तिरेखा साकारली जाणार असल्याने ‘तू भेटशी नव्याने’ ह्या मालिकेच्या प्रोमो नंतर या मालिकेविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. AI च्या माध्यमातून सुबोध भावे विशीतील व्यक्तीरेखेत दिसणार आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत. ही मालिका येत्या 8 जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.