Marathi Serial Updates Star Pravah :  महाराष्ट्रासह देशभरात विठुरायांच्या भक्तांमध्ये आषाढी एकादशीचा उत्साह आहे. आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi) उत्साह छोट्या पडद्यावरील मालिकेत दिसून येत आहे. छोट्या पडद्यावरील मालिकेत आषाढीच्या निमित्ताने कथानकांमध्ये काही नवीन बदल घडणार आहेत. स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’चे मध्ये आषाढीचा उत्साह दिसून येणार आहे. आषाढीच्या निमित्ताने मालिकेतील राया हा आता नव्या लूकमध्ये दिसणार आहे.  या लूकच्या निमित्ताने अभिनेता विशाल निकमने (Vishal Nikam) तब्बल दोन वर्षानंतर केसांना कात्री लावली आहे. 


मालिकेतील आतापर्यंच्या भागात प्रेक्षकांनी रायाचं रांगडं रुप पाहिलं आहे. दाढी-मिश्या आणि केस वाढवून आपल्या मित्रांसोबत गावभर हिंडणाऱ्या राया प्रेक्षकांना भेटला आहे. मात्र, आषाढी एकादशीच्या निमित्ताने रायाचा कायापालट होणार आहे. नव्या रुपातला राया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वरवर फणसासारखा काटेरी आणि कठोर वाटत असला तरी रायाची व्यक्तीरेखा ही प्रचंड प्रेमळ आहे. नव्या रुपासह रायाचा हाच प्रेमळ स्वभावही यापुढील भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


दोन वर्षांनी विशालच्या केसांना लागली कात्री...


विठुरायाचे आशीर्वाद घेत आता मालिकेतील रायाच्या आयुष्यात नवे बदल होणार आहेत. मालिकेतलं हे अत्यंत महत्त्वाचं वळण आहे. रायाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमने तब्बल दोन वर्षांनंतर आपल्या केसांना कात्री लावली आहे. या बद्दल बोलताना विशालने सांगितले की, ''कथानकाची गरज म्हणून जे काही करणं गरजेचं आहे ते करणं हे कलाकार म्हणून मी माझं कर्तव्य समजतो. रायाचा लूक चेंज ही कथानकाची गरज होती. गेली दोन वर्ष एका सिनेमासाठी मी केस वाढवत होतो. योगायोगाने 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेसाठी माझी याच लूकमध्ये निवड झाली. दोन वर्षांनंतर मी स्वत:ला अश्या रुपात पहाणार आहे. मी माझा लूक नक्कीच मिस करेन. मला या रुपात पाहून माझ्या आईला सर्वाधिक आनंद होणार असल्याचे विशालने सांगितले. रायाचा हा नवा अंदाज प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल असेही त्याने सांगितले. 


विशालची विठुरायावर श्रद्धा 


ज्याप्रमाणे रायाची विठुरायावर प्रचंड श्रद्धा आहे त्याप्रमाणेच रायाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमचही विठुरायासोबत खास नातं आहे. माऊलींच्या आशीर्वादामुळेच इथवरचा प्रवास मी करु शकलो असं विशाल सांगतो. विशालच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. हरिपाठ, ज्ञानेश्वरी, कीर्तन आणि प्रवचन ऐकत ऐकत मी मोठा झालो. घरच्यांसोबत अनेकदा वारीमध्ये सामील होत विठुरायाचं दर्शन घेतलं आहे. विठुराया माझं लाडकं दैवत आहे असं म्हटले तरी वावगं ठरणार नाही. 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेची गोष्ट देखील पंढरपुरात घडते. ही माऊलींचीच कृपा आहे. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो अशी भावना विशालने व्यक्त केली.


इतर महत्त्वाची बातमी :