Marathi Serial Updates Lakhat Ek Amcha Dada Serial : छोट्या पडद्यावर सध्या नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'झी मराठी'वर (Zee Marathi) मागील काही महिन्यांपासून नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.  सोमवारपासून झी मराठीवर 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पहिल्याच एपिसोडवर प्रेक्षकांनी कौतुकांचा वर्षाव केला आहे. या मालिकेचा नायक असलेल्या सूर्यादादाच्या यात्रेतील लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.  सूर्यादादाचा यात्रेमधला यात्रेचा सीनबद्दल अभिनेता नितीश चव्हाणने आपला अनुभव शेअर केला आहे.


झी मराठीवर नव्यानेच दाखल झालेल्या 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला. या पहिल्या भागानंतर प्रेक्षकांनी मालिकेवर प्रेमाचा वर्षाव करत आणि सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिसाद दिला. मालिकेचा नायक असलेल्या सूर्यादादाच्या एन्ट्रीवर प्रेक्षकांनी कौतुकांचा वर्षाव केला.एक अभिनेता म्हणून तो सीन साकारण्याचा अनुभव कसा होता हे व्यक्त करताना नितीशने सांगितले, " जेव्हा मला कळलं की यात्रेमधला असा एक सीन करायचा आहे तेव्हा पासून मनात धाकधूक चालू होती. कसा होईल, काय करता येईल हे विचार सतत डोक्यात चालू होते. जेव्हा तो दिवस आला तेव्हा पर्यंत मी काहीही ठरवलं नव्हतं कारण अंगात येणं हे मी आज पर्यंत कधी अनुभवलं नव्हतं म्हणून ते कसं करायचं आणि काय करायचं ह्याची कल्पना नव्हती. जेव्हा मी तयार होऊन बसलो आणि तयार होऊन जेव्हा स्वतःला पहिल्यांदा आरश्यात पाहिलं ते पाहून माझा आत्मविश्वास वाढला असल्याचे नितीशने सांगितले. सीनसाठी मी तयार झालो आणि सर्वात आधी देवी समोर गेलो तिचा आशीर्वाद घेतला आणि तिला प्रार्थना केली की मला माहिती नाही कसं करायचं, काय करायचं, तू माझ्या कडून हे सर्व नीट करून घे. मी पहिला टेक केला आणि तो संपल्यानंतर सर्वानी टाळ्यांचा गजर केला असल्याचे नितीशने सांगितले. 


दोनदा चक्कर आली... 


नितीश चव्हाणने पुढे सांगितले की,  सीनमध्ये असलेली देवीची पालखी ही 20 किलोंची होती. 20 किलोची पालखी आणि तो पेहराव त्यासोबत डायलॉग्स बोलायचे हे सगळं करण्यात दमछाक होतं  होती, एकदा-दोनदा मला चक्कर ही आली पण तरी ही मी थांबलो नसल्याचे त्याने म्हटले. हे सगळं करण्यात एक ऊर्जा आणि  शक्ती अंगात होती. ही  सगळी ऊर्जा देवींनीच दिली असं मी मानतो आणि ती पाठीशी होती म्हणून यशस्वीपणे मी हा सीन निभावू शकलो असल्याची भावूक प्रतिक्रिया त्याने दिली. यात्रेतील देवीच्या पालखीचा हा सीन पूर्ण झाल्यानंतर निर्मात्या श्वेता शिंदे, दिग्दर्शक किरण सरांनी कौतुकाची थाप पाठिवर मारली असल्याचेही नितीशने सांगितले. 


'लाखात एक आमचा दादा'चा  ग्रँड प्रीमियर


'लाखात एक आमचा दादा' ही मालिका प्रसारीत होण्याआधी साताऱ्यामध्ये एक ग्रँड प्रीमियर पार पडला. या ग्रँड प्रीमियरला प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती. यावेळी अभिनेता नितीश चव्हाण साकारत असलेल्या सूर्यादादा या व्यक्तीरेखेचे 30 फूट उंच कटआऊटचे अनावरण करण्यात आले. 


या मालिकेच्या निमित्ताने ‘लागीर झालं जी’ नंतर नितीश चव्हाण पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करत आहे. दिशा परदेशी देखील या मालिकेच्या निमित्ताने मराठी मालिकाविश्वात  नायिकेच्या  भूमिकेत पदार्पण करत आहे. तर,  ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.