Marathi Serial Latest Update : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रमांच्या यादीत आदेश बांदेकरांच्या (Aadesh Bandekar) 'होम मिनिस्टर' (Home Minister) या कार्यक्रमाची गणना होते. गेल्या काही वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण आता या लोकप्रिय कार्यक्रमाची वेळ बदलण्यात आली आहे. 


'होम मिनिस्टर' आता पाहा नव्या वेळेत (Home Minster Time)


'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम सध्या सायंकाळी 6.30 वाजता प्रसारित होत आहे. पण आता या कार्यक्रमाची वेळ बदलण्यात आली आहे. 8 मे 2023 पासून हा कार्यक्रम प्रेक्षकांना सायंकाळी 5.30 वाजता पाहता येणार आहे. झी मराठीने एक खास व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 






'यशोदा' मालिकेची वेळ बदलली


'होम मिनिस्टर'प्रमाणेच 'यशोदा गोष्ट श्यामच्या आईची' (Yashoda) या मालिकेचीदेखील वेळ बदलण्यात आली आहे. ही मालिका प्रेक्षक सायंकाळी सहा वाजता झी मराठीवर पाहू शकतात. 'यशोदा गोष्ट श्यामच्या आईची' या मालिकेची कथा साने गुरुजींना घडवणाऱ्या त्यांच्या आईच्या आयुष्यावर आधारित आहे. 'यशोदा' ही मालिका आधी दुपारी 12.30 वाजता प्रसारित होत होती. 


टीआरपीमुळे कार्यक्रमाची गणिते बिघडली...


'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले आहेत. या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग आहे. अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत मागे पडला आहे. नुकत्याच समोर आलेल्या टीआरपी रिपोर्टनुसार, 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम पहिल्या दहातदेखील नाही. 


लोकाग्रहास्तव 'यशोदा'ची वेळ बदलली


दुसरीकडे दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेली 'यशोदा गोष्ट श्यामच्या आईची' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेची कथा यशोदाची म्हणजेच एका अशा आईची आहे जिने साने गुरुजींना घडवलं. ही मालिका आपल्या मुलांवर संस्कार व्हावेत आणि त्यांना संस्कृतीबद्दल कळावं यासाठी सुरू करण्यात आली होती. पण मुलांना दुपारी ही मालिका पाहणं शक्य होत नसल्याने या मालिकेची दुपारची वेळ बदलावी यासाठी अनेक पालकांचे निर्मात्यांना फोन कॉल्स आणि मेल आले होते. त्यामुळे प्रेक्षकांचा आदर राखत निर्मात्यांनी या मालिकेची वेळ बदलली आहे. 


संबंधित बातम्या


Maharashtra Television News : 'तुझेच मी गीत गात आहे’ ते 'रंग माझा वेगळा' ; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!