मुंबई : 'मराठी बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांनी आता जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी अपेक्षित आहे. सात वर्षांपूर्वीच्या एका खंडणी प्रकरणात सातारा सत्र न्यायालयाने बिचुकलेंचा जामीन अर्ज नुकताच फेटाळला आहे.

चेक बाऊन्स प्रकरणी 21 जून रोजी अभिजीत बिचुकले यांना सातारा पोलिसांनी मुंबईतून 'मराठी बिग बॉस'च्या सेटवरुन अटक केली होती. त्यानंतर बिचुकलेंना खंडणीच्या एका जुन्या प्रकरणातही अटक दाखवण्यात आली. बिचुकले हे मुंबईतून परत येण्याची शक्यता कमी असल्यानेच न्यायालायाने जामीन अर्ज फेटाळत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

BIG BOSS MARATHI 2 | राजकीय स्वार्थासाठी जुनं प्रकरणं उकरलं, अटकेनंतर अभिजीत बिचुकलेची पहिली प्रतिक्रिया



बिचुकले यांनी यंदाची लोकसभा निवडणूकही लढवली होती. या काळात बिचुकलेंना पोलिस संरक्षण देण्यात आलं होतं. तेव्हा पोलिसांनी या प्रकरणातील वॉरंट बजावलं नाही, किंवा त्यांना ताब्यातही घेतलं नाही. इतकी वर्ष बिचुकले सातारा शहरातच होते. त्यामुळे आरोपी फरारी होता हे पोलिसांचे म्हणणे चुकीचे आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षानं सत्र न्यायालयात केला होता.

अभिजीत बिचुकले बिग बॉसमध्ये पुन्हा दिसणार नाही? न्यायालयाने जामीन फेटाळला

कोण आहेत अभिजीत बिचुकले?

साताऱ्यातच मागासवर्गीय घरात बिचुकलेंचा जन्म झाला. घरात धार्मिक वातावरण असून ज्योतिष हा परंपरागत व्यवसाय आहे. बिचुकले सातारा नगरपालिकेत कर्मचारी होते. पण सुट्ट्यांच्या कारणावरुन त्यांनी सहा वर्षांपूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर उपजीविकेसाठी गाण्यांचे शो, ऑर्केस्ट्राचं आयोजन करायला सुरुवात केली.

स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकलेंनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुलेआम आव्हान दिले आहे.

मराठी बिग बॉसच्या घरात यंदा बिचुकले यांची वर्णी लागली होती. बिचुकले सतत या ना त्या कारणामुळे चर्चेतही राहिले होते. सहस्पर्धक रुपाली भोसले हिला शिवीगाळ केल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. त्याचप्रमाणे त्यांना कार्यक्रमातून हटवण्याची मागणीही करण्यात आली होती.

संबंधित बातम्या