Marathi Bhasha Gaurav Din 2023: कवी वि. वा. शिरवाडकर (Vishnu Vaman Shirwadkar) अर्थात कुसुमाग्रज (Kusumagraj) यांचा आज जन्मदिन आहे. हा दिवस मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din) म्हणून साजरा केला जातो. आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जाणून घेऊयात मराठी मालिकांबद्दल...


'टीव्हीवर आमची माती आमची माणसं यांसारखे कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत होते. मालिका म्हणजेच टीव्ही सीरियल हा प्रकार परदेशातून आला होता.  सुरुवातीला 13 भागांच्या (एपिसोड) मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत होत्या. त्यानंतर 13 हून अधिक एपिसोड्सच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येऊ लागल्या.' असं सिने विश्लेषक दिलीप ठाकूर यांनी सांगितलं.


चिमणराव गुंड्याभाऊ मालिका


दूरदर्शन चॅनलनं डीडी सह्याद्री या मराठी चॅनलची सुरुवात केली. डीडी सह्याद्री चॅनलवरुन अनेक मराठी कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत होते. त्यानंतर मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सुरुवात झाली. 1977-79 दरम्यान चिमणराव गुंड्याभाऊ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. ही पहिली मराठी मालिका आहे, असं म्हटलं जातं. चिमणराव गुंड्याभाऊ या मालिकेत अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी चिमणरावांची भूमिका साकारली. तर अभिनेते बाळ कर्वे यांनी गुंड्याभाऊंची भूमिका साकारली होती. ही मालिका ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीस येत होती. बाळ कर्वे आणि दिलीप प्रभावळकर यांच्या चिमणराव गुंड्याभाऊ मालिकेतील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 


श्वेतांबरा मालिका


श्वेतांबरा ही मलिका भयकथेवर आधारित असणारी पहिली मराठी मालिका आहे, असं म्हटलं जात. ही मालिका विल्की कॉलिन्स यांच्या 'वुमन इन व्हाईट' या कादंबरीवर आधारित होती. या मालिकेत विक्रम गोखले, मोहन गोखले, प्रदीप पटवर्धन यांनी प्रमुख भूमिका साकारली. 1983 मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. 


'या' मराठी मालिकांनाही पसंती


गोट्या, गंगाधर टिपरे, वादळवाट यांसारख्या मालिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाचं आणि मालिकेच्या कथानकाचं प्रेक्षकांचे कौतुक केले. 


सध्या विविध विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सुरुवातीच्या काळातील मालिका पाहिल्या तर त्यामध्ये मर्यादित तंत्रज्ञानामुळे साधेपणा दिसत होता. पण आता मालिकांमध्ये विविध स्टंट, व्हिज्युअल इफेक्ट्स यांचा सहज वापर केला जातो. मालिकांच्या कथानकामधील बदलते काळ, मालिकेतील भूमिकांचे वाढलेले वय या गोष्टी व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून किंवा मेकअपच्या माध्यमातून दाखवल्या जातात. पण जुन्या मालिकेमध्ये असणारा निखळपणा आजही ज्येष्ठ व्यक्ती तरुणाईला कौतुकाने सांगतात. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Marathi Bhasha Gaurav Din 2023 : मराठी भाषा गौरव दिन, शुभेच्छा देत सांगा मायबोलीचं महत्त्व