मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकार सोशल मीडियावर थकलेल्या मानधनाबद्दल बोलत आहेत. यात शशांक केतकर, शर्मिष्ठा राऊत, संग्राम समेळ आदी कलाकारांचा समावेश होतोय. या सगळ्यांच्या बोलण्याचा रोष मराठी टीव्हीसृष्टीतले अनुभवी मोठे निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर आहे. शर्मिष्ठा यांनी आपल्या पोस्टमध्ये त्याचा उल्लेखही केला आहे.


शशांक केतकरने काही दिवसांपूर्वी मानधन थकल्याची पोस्ट टाकली. त्यांनतर मन हे बावरे या मालिकेच्या संग्राम समेळ, शर्मिष्ठा राऊत यांनीही मृणाल दुसनिस यांना टॅग करत पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या.


अभिनेता संग्राम समेळची पोस्ट अशी..


नमस्कार !
आम्ही कलाकार नेहमी आपल्याकडुन चांगलं काम व्हावं या हेतूने मेहनत घेत असतो. उत्तम काम आणि ते केल्यावर त्याचा योग्य मोबदला हाच हेतू असतो आणि तो असावा. पण काम करुनही त्याचा पैसा वेळेवरच न मिळणे, योग्य आहे?


अनेक वेळा असं होत की आपण खूप प्रामाणिक पणे आपले काम( शुटिंग) करतो. आपलं प्रोजेक्ट हे आपलं बाळ आहे आणि प्रोडक्शन हाऊस हे आपलं घर अस समजून वेळेची, परिस्थितीशी, घरच्यांशी, प्रोडक्शन हाऊस कडून न मिळणाऱ्या गोष्टींशी, हाऊसच्या मिसमॅनेजमेटशी अॅडजस्टमेंट करून सर्व तंत्रज्ञ आणि कलाकार अविरत काम करत असतात. चॅनलचा उत्तम सपोर्ट असूनही काही निर्माते कामाचा योग्य तो मोबदला देत नाहीत. अनेक कारणं वारंवार मिळतं असतात. आम्ही मात्र निर्माता जगला तर कलाकार जगला ह्या तत्वांतर्गत काम करत असतो. मग वेळच्या वेळी चॅनलकडून पैसे येवून पण कलाकारांना आणि तंत्रज्ञानांना पैसे निर्मात्याकडून न मिळण हे योग्य आहे का?


निर्मात्याच्या अडीअडचणींच्या वेळेस, एपीसोडची बँक नाही म्हणून किंवा कधी कधी निर्मात्यांकडे कॉस्च्यूम नाही म्हणून घरून आपले कॉस्च्यूम आणून शूटिंगचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मदत करणे आता चूक आहे का? आपल्याच मेहनतीचा हक्काचा पैसा मोबदला भीक मागीतल्या सारखा सतत मागत रहाणे हे योग्य आहे का? शर्मिष्ठा राऊतनेही निर्माते मंदार देवस्थळी यांचे नाव घेऊन पोस्ट लिहिली. त्यांनतर मात्र चर्चेला उधाण आलं. मंदार देवस्थळी हे मनोरंजनसृष्टीतलं मोठं नाव आहे.





दोन दिवसांपासून पैसे थकल्याची चर्चा सुरू असतानाच आता निर्माते मंदार देवस्थळी यांनी आपली बाजू इन्स्टावर मांडली आहे. माझा पैसे बुडवण्याचा कोणताही हेतू नाही. फक्त आत्ता माझी आर्थिक स्थिती बिकट आहे. मी माणूस वाईट नाही. यातून मी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहेच. आत्ता माझी पैसे देण्याची कुवत नाहीय पण देवाच्या कृपेने ही स्थिती बदलेल. तुम्हला जो मनस्ताप झालाय त्याबद्दल मी माफी मागतो अशा आशयाची पोस्ट लिहिली आहे.


मंदार यांच्या वादळवाट, होणार सून मी ह्या घरची, किमयागार, बोक्या सातबंडे, मन हे बावरे आदी मालिकांनी मोठी लोकप्रियता मिळवली आहे. शिवाय कच्चा लिंबू या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचीही निर्मिती केली आहे.