Man Udu Udu Zala Serial : "मन उडु उडु झालं" ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. झी मराठीवरील या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. या मालिकेतील व्यक्तीरेखादेखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटत आहेत. उडू उडू म्हटल्यावर मनात येत असतं ते उंच भरारी. आता या मालिकेतील इंद्रा आणि दिपू म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे यांनी अशीच उंच भरारी घेतली आहे. 

Continues below advertisement


"मन उडु उडु झालं" मालिकेतील इंद्रा आणि दिपूने हॉट एअर बलूनची सफर करत आकाशाला गवसणी घातली आहे. मालिकेच्या प्रचारासाठी हा आगळावेगळा प्रयोग करण्यात आला होता. या प्रयोगासाठी हृता आणि अजिंक्य खूप उत्सूक होते. त्यांनी त्या प्रयोगाचा मनसोक्त आनंद देखील घेतला. तसेच या हॉट एअर बलूनमध्ये मालिकेतील काही सिनदेखील चित्रित करण्यात आले आहेत. प्रेक्षकांना लवकरच या सर्व भागांचा आनंद लुटता येणार आहे. हा भन्नाट अनुभव टीव्हीवर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी मालिकेचा एकही भाग चुकवू नये. 


या भन्नाट अनुभवाबद्दल हृता म्हणाली, "माझा अजूनदेखील आम्ही अनुभवलेल्या या प्रयोगाबद्दल विश्वास बसत नाही. माझ्या कल्पने पलीकडचं होतं. "मन उडु उडु झालं" म्हणत आम्ही खरोखरच उडत आहोत". या अनोख्या अनुभवाबद्दल अजिंक्य म्हणाला, "मन उडु उडु झालं" या मालिकेला प्रेक्षक खूप उदंड प्रतिसाद देत आहेत. याचा खूप आनंद होत आहे. उडू उडू या शब्दाशी संदर्भ लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या मालिकेमुळे आम्हाला अनुभवायला मिळत आहेत. हॉट एअर बलूनचा प्रयोगदेखील त्याचाच एक भाग होता. प्रेक्षकांनी आमच्यावर असेच प्रेम करावे आणि त्यांच्या अफाट प्रेमाने आमची मालिकादेखील लोकप्रियतेची गगनभरारी घेईल".  


"मन उडु उडु झालं" मालिकेतील हृता याआधी "दुर्वा" आणि "फुलपाखरू" या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यातील तिने साकारलेल्या भूमिकेचे प्रेक्षक प्रचंड कौतुक करत होते. आजही तिने साकारलेल्या या दोन्ही भूमिकांचे कौतुक होत असते. हृता आता लवकरच "अनन्या" या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनन्या सिनेमाआधी रुईया महाविद्यालयाने अनन्या ही एकांकिका सादर केली होती. त्यात स्पृहा जोशीने अनन्या भूमिका साकारली होती. तर अनन्याचे नंतर व्यावसायिक नाटकात रुपांतर झाले. त्यात ऋतुजा बागवे अनन्याच्या भूमिकेत दिसली होती. तिच्या त्या भूमिकेची प्रचंड चर्चा झाली होती. आता हृताने सिनेमात केलेल्या भूमिकेविषयी प्रेक्षक उत्सुक आहेत.