Bigg Boss Marathi 3 : गेले दोन दिवस विकेन्डचा डाव चांगलाच रंगला होता. घरातील स्पर्धकांना महेश मांजरेकरांनी चांगलेच सुनावले. आता मांजरेकरांनी केलेल्या सुचनांचे पालन स्पर्धक किती करणार हे येणारा आठवडाच ठरवणार आहे. शिवलीला पाटीलची प्रकृती खालावल्यामुळे तिने बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्पर्धकांना कळताच घरातील सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. विशाल निकम, सोनाली पाटील, मीनल शाह यांना अश्रू अनावर झाले होते. तिने घेतलेल्या या निर्णयानंतर आज विशाल आणि घरातील इतर सदस्य त्यांची मते मांडताना दिसणार आहेत.
शिवलीलाच्या निर्णयामुळे विशाल अत्यंत भाऊक झाला होता. तो त्याच्या भावना सोनाली, मीनलला सांगताना दिसणार आहे. विशाल म्हणाला,"ती असायला हवी होती, खूप शिकवून गेली. तिने दिलेला विश्वास आपल्याला कधीच मोडता येणार नाही. काही माणसं दोन दिवस आयुष्यात येतात आणि आयुष्यभराची जागा करुन जातात, त्यातली ती आहे". मीनल म्हणाली, "ती कशी होती आपल्याला माहिती आहे. तिच्यासारखी मुलगी मी कधीच बघितली नाही. तिच्यासमोर असलेल्या ज्ञानापुढे आपण कोणीच काही नाही आहोत".
दोन दिवस रंगलेल्या या बिग बॉसच्या चावडीमध्ये काहींची कानउघडणी झाली, काहींना महेश मांजरेकर यांनी समजावून सांगितले तर काही सदस्यांना ते कसे आणि कुठे चुकले हे देखील दाखवून दिले. वूटद्वारे जय आणि विशालसाठी अतरंगी डिमांड आले होते. त्यात जयने बाजी मारली. त्यासोबत "चुगली बूथ"मध्ये जयच्या फॅनने त्याला चुगली केली. त्यात विकास आणि विशाल काय म्हणाले ते उघड केले. काल बिग बॉसच्या घरात "एकच फाईट वातावरण टाईट" हा टास्क पार पडला. यात स्पर्धकांनी बॉक्सिंग क्लोज घातले होते. त्यांच्या समोर घरातील सदस्यांचे फोटो होते. त्यातील त्यांना हव्या असलेल्या सदस्याचा फोटो घेऊन त्याला बॉक्सिंगचे पंच द्यायचे होते.
आज कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये घरात फोन वाजताना दिसून येत आहे. त्यात बिग बॉस स्पर्धकांना म्हणत आहेत. बिग बॉस आपणा सर्वांना आपले फोन परत देत आहेत. त्यानंतर घरातील सर्व सदस्य प्रचंड खूश दिसून येत आहेत. बिग बॉसच्या घरात या आठवड्यात कोण कोणाला भिडणार? कोणते टास्क रंगणार? कोण बाजी मारणार? कोणाच्या हाती हार येणार? कोणाला मिळणार कॅप्टन बनण्याचा बहुमान मिळणार याकडे लक्ष लागून आहे.