Man Suddha Tuza : साहित्यावर आधारित मालिकांची निर्मिती करणारे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि लेखक प्रशांत दळवी यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोरोनाकाळात शारीरिक व्याधींनी लोक वैतागले होते पण अगदी प्रत्येकाने तितकाच मानसिक ताण सहन केला आहे. हे मानसिक तान वेगवेगळ्या प्रकारचे होते. शारीरिक व्याधी औषधाने बऱ्या होतात. पण मानसिक गुंता सोडवणं कधीकधी खूप कठीण होऊन बसतं. खरं तर उपाय खूप सोपा असतो पण मनुष्य स्वभाव, भावभावना, नात्यांमधली गुंतागुंत यांच्यामुळे समस्येचा तिढा इतका वाढतो की 
प्रश्न डोंगराएवढे वाटू लागतात. अशाच घरोघरी आढळणाऱ्या मानसिक गुंतागुंतीची उकल करणारी अनोखी मालिका आहे "मन सुद्ध तुझं". 


3 ऑक्टोबरपासून दर रविवारी सकाळी साडे दहा वाजता "मन सुद्ध तुझं" ही मालिका एबीपी माझावर प्रसारित होणार आहे. तर दर  रविवारी रात्री 8 वाजता या मालिकेचे पुन:प्रक्षेपण होणार आहे. मानसिक आरोग्य या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आधारित मालिका 
पहिल्यांदाच एका वृत्तवाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. 


"मन सुद्ध तुझं" या मालिकेत नांदेडचे प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. नंदू मुलमुले यांच्या पुस्तकातील कथा दाखविण्यात येणार आहेत. डॉ. मुलमुले यांना त्यांच्या प्रदीर्घ प्रॅक्टीसदरम्यान वेगवेगळी माणसं भेटत होती. तसेच मानसिक गुंतागुंतीच्या समस्या समाजात सर्वत्र दिसल्या 
त्याच त्यांनी त्यांच्या कथांमधून मांडल्या आहेत. 


डॉक्टरांच्या त्या कथांचं मालिकेत रुपांतर पटकथा- लेखक प्रशांत दळवी यांनी केलं आहे, तर मालिकेचं दिग्दर्शन प्रसिद्ध नाट्य आणि  चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचे आहे. मालिकेत मानसोपचारतज्ञांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता स्वप्निल जोशी यांनी साकारली 
आहे. तर विविध कथांमध्ये शरद पोंक्षे, प्रतिक्षा लोणकर, नीना कुलकर्णी, सुनील बर्वै, श्रीकांत यादव, प्रसाद खांडेकर, पुष्कर श्रोत्री, मानसी कुलकर्णी सई रानडे अशा अनेक नामवंत मराठी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.  याचबरोबर काही लहान मुलांनीही या मालिकेत अत्यंत चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.


या मालिकेमुळे मानसिक आरोग्याचं महत्त्व अधोरेखित होणार आहे. त्याचबरोबर नात्यांमध्ये न सुटणाऱ्या गुंत्याची हळूवार रंजकपणे उकल होण्यासदेखील मदत होणार आहे. कोरोनाकाळात समाजात अनेक मानसिक समस्या वाढताना दिसून येत आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच 
एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर या पद्धतीची मनाचा गुंता उलगडणारी तेरा भागांची मालिका सादर केली जाणार आहे.